मुंबई : नांदेडच्या देगलूर बिलोली मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रावसाहेब अंतापूरकर हे कोरोनामुळे निधन झालेले भारत भालके यांच्यानंतरचे दुसरे विद्यमान आमदार आहेत. सर्वसामान्य काँग्रेसचे कार्यकर्ते ते देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा होता.


17 मार्च रोजी रावसाहेब अंतापूरकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. सुरुवातीला त्यांनी नांदेड हॉस्पिटलमध्ये  प्राथमिक उपचार घेतला. मात्र त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने 20 मार्च रोजी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होत. 


त्यांना 8 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान इक्मो मशीन लावण्यात आले. तरीही त्यांच्या शरीराने साथ दिली नाही. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची तब्येत आणखीच खालावल्यामुळे ते व्हेंटिलेटरवर होते. परंतु 9 एप्रिल रोजी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली पत्नी असा परिवार आहे. आज देगलूर इथे मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


महाराष्ट्राने दोन आमदार कोरोनामुळे गमावले
दरम्यान रावसाहेब अंतापूरकर हे कोरोनामुळे निधन झालेले भारत भालके यांच्यानंतरचे दुसरे विद्यमान आमदार आहेत. याआधी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचंही कोरोनामुळे निधन झालं होतं. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर सध्या पोटनिवडणूक होत आहे. त्यातच आता रावसाहेब अंतापूरकर यांचीही प्राणज्यात कोरोनामुळे मालवली.


दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.