Ameya Khopkar : 'आत्मपॅम्फ्लेट' (Aatmapamphlet) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनीही हा सिनेमा पाहिला आहे. एकीकडे या सिनेमाचं कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. चांगल्या सिनेमाला प्रेक्षक जात नसल्याने मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? असा सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे. 


'आत्मपॅम्फ्लेट' हा सिनेमा पाहिल्यानंतर अमेय खोपकर यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"आत्मपॅम्लेट' हा मराठी सिनेमा आज बघितला. अतिशय उत्तम सिनेमा आहे. जो भरपूर हसवणूक करतो आणि तितकाच विचार करायलाही लावतो. हा सिनेमा फक्त मराठीच नाही तर देशभरातील सर्व प्रेक्षकांना पाहायला हवा असा झालेला आहे". 



अमेय खोपकर यांनी लिहिलं आहे,"दुर्दैवाने आज जेव्हा मी चित्रपट बघितला तेव्हा आम्ही फक्त पाचजण सिनेमागृहामध्ये होतो. मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? एका उत्कृष्ट कलाकृतीला प्रेक्षक मिळत नसतील तर नेमकं काय चुकतंय आणि हे असं का होतंय याचा आता निर्माते आणि प्रेक्षक सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. भविष्यात यासाठी पुढाकार घेऊन जे जे करावं लागेल ते आम्ही करणारच".


...तर मराठीची अवस्था आणखी बिकट होईल : अमेय खोपकर


अमेय खोपकर यांनी पुढे लिहिलं आहे,"पण सध्यातरी माझं सर्वांना आवाहन आहे की,'आत्मपॅम्फ्लेट' हा सिनेमा आवर्जुन बघा...असे चांगले सिनेमे मराठीत फार कमी बनतात. जर आता त्यांना आपण प्रतिसाद दिला नाही तर दिवसेंदिवस मराठीची अवस्था आणखी बिकट होत जाईल". 


अमेय खोपकर यांच्या पोस्टवर मराठी प्रेक्षक 'जवान' पाहायला जातील, मराठी सिनेमे कधी येतात आणि जातात हेच लोकांना माहिती नसतात, मार्केटिंगमध्ये मराठी सिनेमा कमी पडतो, मराठी माणसाची मानसिकता कारणीभूत आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


'आत्मपॅम्फ्लेट' सिनेमाबद्दल जाणून घ्या... (Aatmapamphlet Movie Details)


'आत्मपॅम्फ्लेट' हा सिनेमा 6 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. अत्यंत अतरंगी, तिरकस मित्रांची विनोदी प्रेमकथा या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आशिष बेंडे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. बर्लिन आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात 'आत्मपॅम्फ्लेट'चा वर्ल्ड प्रीमियर झाला. तसेच नुकत्याच झालेल्या आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्स ऑस्ट्रेलियामधे सत्तर देशांमधल्या चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट युथ फिल्मचा पुरस्कारही  या चित्रपटाला मिळाला.


संबंधित बातम्या


Aatmapamphlet : अतरंगी, तिरकस, विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट'चा ट्रेलर आऊट