Palyad Official Trailer: काही चित्रपट प्रदर्शनापूर्वीच मोठमोठी शिखरं सर करत इतिहास रचतात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांचे मानकरी ठरल्यानंतर रसिकांच्या सेवेत रुजू होतात. प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या 'पल्याड' (Palyad) या आगामी मराठी चित्रपटानंही अशाच प्रकारे इतिहास रचत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वीची आपली नेत्रदीपक वाटचाल सुरू ठेवली आहे. जागतिक पातळीवरील आघाडीच्या फोर्ब्स मासिकानंही दखल घ्यावी इतका मोठा बहुमान पटकावत 'पल्याड'नं मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नुकतीच 'पल्याड' चित्रपटाची गोव्यात होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियासाठी (इफ्फी) निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. याच सकारात्मक आणि जल्लोषमय वातावरणात 'पल्याड'चा दिमाखदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ट्रेलरचं प्रचंड कौतुक होत असून, प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागवणारा 'पल्याड'च्या ट्रेलरची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
4 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'पल्याड'ची निर्मिती चंद्रपुरातील व्हिजनरी व्यावसायिक व निर्माते पवन सादमवार, सुरज सादमवार, मंगेश दुपारे, प्रणोती पांचाळ आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी एलिवेट फिल्म्स व एलिवेट लाईफ आणि लावण्य प्रिया आर्टसच्या बॅनरखाली केली आहे. के सेरा सेरा डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेश दुपारे यांनी केलं आहे. 'पल्याड'चा ट्रेलर पाहताक्षणी लक्ष वेधून घेणारा आहेच, पण चित्रपटात नेमकं काय पहायला मिळेल याबाबत उत्सुकताही वाढवणारा आहे. 'मुक्ती देईन म्हणजे काय रं आबा?' हा 'पल्याड'च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच लहान मुलानं विचारला प्रश्न अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. पाप-पुण्याच्या फेऱ्यातून मुक्त करणं म्हणजे मुक्ती असा ढोबळ अर्थ त्या मुलाला सांगितला जातो. या चित्रपटात लोकांसाठी मुक्तीचं दान मागणाऱ्या स्मशानजोगी समाजाची कथा पहायला मिळेल. 'उंच उंच उडू आज, आभाळात फिरू...' हे लहानग्यांच्या डोळ्यांत तरळणाऱ्या स्वप्नांना पंखांची जोड देणारं गाणं ट्रेलरमध्येही आहे. स्मशानजोगी समाजातील लहान मुलाला अशिक्षीत राहून लोकांना मुक्ती देण्याऐवजी शाळेत जाऊन शिकण्याची इच्छा असते, पण त्यानं शाळेकडे फिरकलेलंही समाजाला मान्य नसतं. अशा परिस्थितीत शिकण्याची इच्छा असलेला मुलगा आणि त्याला शिकून मोठं झाल्याचं स्वप्न पाहणारी त्याची आई काय करते ते चित्रपटात पहायला मिळणार असल्याचं ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं. आशयघन कथानक, समाजाभिमुख विषय, सुरेख वातावरण निर्मिती, वास्तवदर्शी लोकेशन्स, समाजातील कटू सत्य मांडणारं दिग्दर्शन आणि कलाकारांचा सहजसुंदर अभिनय यांचा सुरेख संगम 'पल्याड'मध्ये पाहायला मिळणार असल्याची झलकच ट्रेलर दाखवतो.
पाहा ट्रेलर:
'पल्याड'ची कथा सुदर्शन खडांगळे यांनी लिहिली असून, सुदर्शन खडांगळे आणि शैलेश भीमराव दुपारे यांनी पटकथा व संवादलेखन केले आहे. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक गीतेश नीमजे आहेत. इफ्फी गोव्यामध्ये निवड होण्यापूर्वी आजवर जवळपास 14 चित्रपट महोत्सवांमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या 'पल्याड'मध्ये शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, बल्लारशहा मधील बाल कलाकार रुचित निनावे, देवेंद्र दोडके, वीरा साथीदार, सचिन गिरी, गजेश कांबळे, सायली देठे, भारत रंगारी, बबिता उइके, रवी धकाते, राजू आवळे आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. कलाकारांना अचूक वेशभूषा करण्याचं काम विकास चहारे यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 25 दिवसांमध्ये या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Palyad: मराठमोळ्या 'पल्याड' चित्रपटाचा डंका; आंतरराष्ट्रीय मासिक 'फोर्ब्स'ने घेतली दखल