Akshay Kumar Latest News :  माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. अनेकांच्या वाटेला संघर्षाचा काळ येतो. बहुतांशी सगळेजण आपले जुने दिवस विसरत नाही. लहानपणी म्हणा किंवा ऐन तारुण्यात बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही संघर्ष करतात. सगळ्यांच्या मनात बालपणीच्या आठवणींना विशेष स्थान असते.  बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही (Akshay Kumar) आपल्या जुन्या दिवसांना विसरला नाही. ज्या भाड्याच्या घरात अक्षय कुमारचे बालपण गेले. तेच घर आता हा अक्षय कुमार खरेदी करणार आहे. 


अक्षय कुमारने नुकतेच आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. शालेय दिवसांची आठवणींना उजाळा देताना त्याने सांगितले की, त्याला आजही त्याच्या शाळेत जायला खूप आवडते. इतकेच नाही तर आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी अभिनेता त्याचे बालपण ज्या घरात गेले आहे तेच घर खरेदी करण्याच्या विचारात आहे. 


ते घर खरेदी करण्याची इच्छा...


अक्षय कुमारने नुकतीच रणवीर अल्लाहबादिया याला एक मुलाखत दिली. त्या दरम्यान, अक्षय कुमारला डॉन बॉस्कोच्या शाळेत जाऊन कसे वाटले? यावर उत्तर देताना अक्षय कुमारने म्हटले की, या मागचे नेमकं कारण मला माहित नाही पण तिथे जाऊन बरे वाटते. मलाही माझ्या जुन्या घराला भेट द्यायला आवडते. माझ्या लहानपणी आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो ज्याचे भाडे 500 रुपये होते.


आम्ही राहत असलेली इमारत आता पाडणार असल्याचे मला समजले. त्या इमारतीचा पुनर्विकास सुरू होणार आहे. मी आधीच मला संपूर्ण तिसरा मजला खरेदी करायचा आहे असे सांगितले आहे. लहानपणी मी तिथेच राहत होतो.


लहानपणीच्या आठवणीत रमायचे आहे...


अक्षय कुमारने ते घर खरेदी करण्यामागील कारणदेखील सांगितले. लहानपणीच्या आठवणी खास असतात. माझं तिकडं असं कोणी नाही. पण, मला आठवतं की  माझे वडील 9 ते 6 या वेळेत कामाला जायचे. त्यांच्या परतीच्या वेळेत मी आणि बहीण खिडकीजवळ उभे राहून त्यांची वाट पाहायचो. इमारतीजवळ एक पेरुचे झाड होते, आम्ही पेरू तोडायचो. आजही ते झाड तिथे आहे असेही अक्षय कुमारने सांगितले. 






अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची भूमिका असलेला  'बड़े मियां छोटे मियां' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 10 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.