Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडणार आहे. सोबतच इतर पदांसाठीचीही निवडणूक पार पडेल. यावेळी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं देखील उडी घेतली आहे.
नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राजकीय रंग
नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रसाद कांबळींना (Prasad Kambli) आशिष शेलारांचा (Ashish shelar) तर प्रशांत दामलेंना (Prashant Damle) उदय सामंतांचा (Uday Samant) पाठिंबा बघायला मिळत आहे. निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 60 सदस्य दाखल झाल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून उद्या मतदान पार पडेल. दरम्यान, नाट्य परिषदेच्या निवडणुकीत ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचं पारडं जड मानलं जातं आहे. राजकीय रंग आलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे आज कळणार आहे.
प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले यांच्यात चुरशीची लढत
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. या निवडणुकीत प्रसाद कांबळी यांचे 'आपलं पॅनल' आणि प्रशांत दामले यांचं 'रंगकर्मी समूह' या दोन गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली. अखेर या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या 'रंगकर्मी समूहा'चे दहा उमेदवार निवडून आले. दुसरीकडे प्रसाद कांबळी यांच्या पॅनलचे चार उमेदवार नियामक मंडळावर निवडून आले. आता आज अध्यक्षपदासाठीची निवडणुक पार पडणार आहे. या निवडणुकीत प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले यांच्यात चुरस असून परिषदेचे राज्यभरातील 60 सदस्य यासाठी मतदान करणार आहेत. नाट्यपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची नाट्यवर्तुळात चर्चा सुरू आहे. अखेर आज अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे समोर येईल.
नाट्य परिषदेची निवडणूक आणि न संपणारे वाद...
नाट्य परिषदेची निवडणूक म्हटलं की वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप या गोष्टी आल्याच. यंदाच्या निवडणुकीदरम्यानही गटबाजी, भांडणं, नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. एकीकडे प्रसाद कांबळी यांच्या पॅनलमध्ये रंगभूमीवर कार्यरत असलेले नाट्यकर्मी, बॅकस्टेज आर्टिस्ट आणि रंगभूमीशी जवळीक असणारी मंडळी आहेत. तर दुसरीकडे प्रशांत दामले यांच्या पॅनलमध्ये अनेक लोकप्रिय रंगकर्मी आणि नाट्यनिर्माते आहेत. हे दोन गट आता आमने-सामने ठाकले आहेत.
प्रसाद कांबळी यांनी 'रंगकर्मी समूहा'ने उद्योगमंत्री उदय सामंत यांचा राजकीय आधार घेतल्याचा आरोप करत स्वत:च्या पॅनलसाठी मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी हातमिळवणी केली आहे.
संबंधित बातम्या