Ajay Devgn Kajol Love Story : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आज आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. अजय आणि काजोलच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. अजय-काजोल 1999 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. अजयचे 'विजयपथ', 'दृश्यम', 'इश्क', 'सिंघम' सारखे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अजयचा स्वभाव खूपच शांत असल्याचं चाहत्यांना वाटतं. पण काजोलला (Kajol) मात्र पहिल्या भेटीत अजय घमेंडखोर वाटला होता. अजयच्या वाढदिवसानिमित्त (Ajay Devgn Birthday) खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने आपल्या लाडक्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काजोलला सुरुवातीला अजय आवडत नसे. एका मुलाखतीत अजयने स्वत: याबद्दल भाष्य केलं आहे.


Pioneer ला दिलेल्या मुलाखतीत अजय देवगणने काजोल आणि त्याच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. अजय देवगण आणि काजोल यांची पहिली भेट 1995 मध्ये 'हलचल' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. पहिल्याच भेटीत काजोलला अजय खूप लाऊड, घमेंडी आणि स्वत:च्या विश्वात रमणारा वाटला होता. त्यामुळे पुन्हा कधीही अजयला भेटायचं नाही असं काजोलने ठरवलं होतं.


अजय-काजोल यांची फिल्मी लव्हस्टोरी (Ajay Devgn Kajol Love Story)


अजय देवगण आणि काजोल यांची पहिली भेट 1995 मध्ये 'हलचल' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. अजय आणि काजोल या दोघांचाही हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती काजोल नव्हती. दिव्या भारतीला (Divya Bharti) निर्मात्यांनी विचारणा केली होती. पण त्यांच्या निधनाने काजोलला हा सिनेमा मिळाला. या चित्रपटाच्या माध्यमातून अजय आणि काजोल पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकले. अजय देवगणचा स्वभाव शांत आहे. तर दुसरीकडे काजोल चुलबुली आहे. 'हलचल' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अजय दुसऱ्याच एका मुलीला डेट करत होता. तसेच काजोलदेखील एका वेगळ्याच मुलासोबत रिलेशनमध्ये होती. दरम्यान दोघांचाही ब्रेकअप झाला आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. 


काजोल आणि अजय देवगण चार वर्षे रिलेशनमध्ये होते. पुढे त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना अनेकांनी विरोध केला. दोघांचे स्वभाव विभिन्न असल्यामुळे त्यांचं नातं टिकू शकत नाही, असं अनेकांचं मत होतं. काजोलच्या घरच्यांनाही हे लग्न मान्य नव्हतं. काजोलच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता. आज काजोल आणि अजय देवगणचा सुखी संसार सुरू असून त्यांना नीसा आणि युग ही दोन मुले आहेत. अजय-काजोलच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 


अजयच्या वाढदिवसानिमित्त काजोलची खास पोस्ट (Kajol Wishes Ajay Devgn)


अजय देवगणच्या वाढदिवसानिमित्त काजोलने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. काजोलने लिहिलं आहे,"तुला तुझ्या वाढदिवसाची किती उत्सुकता असते हे मला माहिती आहे. एखाद्या लहानमुलाप्रमाणे तू वाढदिवसासाठी उत्सुक असतो. लहानमुलांप्रमाणे वाढदिवस साजरा करायला तुला आवडतं. तुला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा". अजय-काजोलच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता दोघांच्याही आगामी चित्रपटांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 






संबंधित बातम्या


Bollywood Actor : बॉलिवूडचा 'हा' अभिनेता शिवभक्तीत तल्लीन; नेहमी सोबत ठेवतो रुद्राक्ष; घराचं नावंही ठेवलंय 'शिवशक्ती'