Aishwarya Rajinikanth Jewellery Steal:  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेते  रजनीकांत (Rajinikanth)  यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतच्या (Aishwarya Rajinikanth) घरातून लाखो रुपये किंमत असणारे दागिने काही दिवसांपूर्वी चोरीला गेले होते. या प्रकरणी ऐश्वर्यानं पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. अशातच आता पोलिसांना चोर सापडले असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, विश्वासू कर्मचाऱ्यांनीच ऐश्वर्या रजनीकांतचा घात केला आहे. घरातील मोलकरीण आणि  ड्रायव्हरला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. 


घरातील मोलकरीण आणि ड्राव्हरनं केली चोरी


ऐश्वर्या रजनीकांतनं पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत सांगितलं की, तिच्या घरातून तीन लाखपेक्षा जास्त किंमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. ज्यामध्ये सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचा समावेश होता. आयपीसी कलम 381 नुसार, पोलीस या प्रकरणाची तपासणी करत होते. चोरी झालेले दागिने ऐश्वर्याने 2019 मध्ये बहिणीच्या लग्नात वापरले होते. त्यानंतर हे दागिने लॉकरमध्येच होते. पण नंतर हे दागिने गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर ऐश्वर्याने तक्रार दाखल केली आहे. 


ऐश्वर्यानं तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. पीटीआयच्या माहितीनुसार, चेन्नई पोलिसांनी ऐश्वर्या रजनीकांतच्या घरातील मोलकरीण ईश्वरी आणि ड्रायव्हर व्यंकटेश यांना अटक केली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बराच काळ ऐश्वर्याच्या घरी काम केल्यामुळे ईश्वरीला लॉकरच्या चावीबाबत पूर्ण माहिती होती. ऐश्वर्या रजनीकांतच्या मोलकरणीने ड्रायव्हरच्या सांगण्यावरून चोरले होते. तिने घर खरेदीसाठी दागिन्यांचा वापर केला, ईश्वरीकडून तिच्या घराचे कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.


ऐश्वर्याची बहिण 2019 मध्ये लग्नबंधनात अडकली. त्यानंतर दागिने असलेलं लॉकर तीन ठिकाणी हलवण्यात आलं. 2019 ते 2021 पर्यंत हे लॉकर सेंट मेरी रोड येथील अपार्टमेंटमध्ये होतं. त्यानंतर ते सीआयटी कॉलनीत हलवण्यात आलं. सीआयटी कॉलनीत ऐश्वर्या धनुषसोबत राहत होती. धनुषपासून विभक्त झाल्यानंतर ते लॉकर पुन्हा रजनीकांत यांच्या पोइस गार्डन रेसिडेन्समध्ये हलवण्यात आलं. 


ऐश्वर्या रजनीकांत ही अभिनेता धनुषची पूर्व पत्नी आहे. ऐश्वर्या आणि धनुष 2004 साली लग्नबंधनात अडकले होते. त्यांना दोन मुले आहेत. धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना घटस्फोटाबद्दल सांगितलं. ऐश्वर्या रजनीकांतने अनेक साऊथ चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. सध्या ती 'लाल सलाम' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. हा चित्रपट क्रिकेटवर आधारित आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Dhanush and Aishwarya Divorce : धनुष आणि ऐश्वर्याच्या घटास्फोटनंतर सौंदर्या रजनीकांतकडून पोस्ट शेअर, म्हणाली....