Adipurush Controversy : 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा देशभरात चर्चेत आहे. कुठे या या सिनेमावर टीका, विरोध होत आहे. तर कुठे तोडफोडही करण्यात येत आहे. आता पालघर जिल्ह्यातील नालासोपारामधील (Nalasopara) एका सिनेमागृहातील 'आदिपुरुष'चा शो हिंदू संघटनांनी बंद पाडला आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


नालासोपारा येथील एका सिनेमागृहात 18 जून 2023 रोजी 'आदिपुरुष' सिनेमाच्या एका शोचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचवेळी काही हिंदू संघटनांनी सिनेमागृहात चांगलाच गोंधळ घातला. या आंदोलकांनी सिनेमाचं प्रदर्शनदेखील थांबवलं. घोषणाबाजी करत सिनेमागृहातील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


गोंधळ अन् घोषणाबाजी करत बंद पाडला 'आदिपुरुष'चा शो


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आंदोलक म्हणत आहेत की,"आमच्या देवाचा अपमान झालेला आम्ही सहन करू शकत नाही, तुम्ही तुमच्या मुलांना या गोष्टी शिकवणार का?, आमच्या देव-देवतांचा अपमान करणाऱ्यांचा आम्ही विरोध करणार, फासावर चढावं लागलं तरी चालेल पण अपमान सहन करणार नाही". तसेच त्यांनी बॉलिवूडविरोधात घोषणाही केल्या. 






आंदोलक गोंधळ घालत असताना सिनेमागृहातील एक व्यक्ती त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. पण या आंदोलनकर्त्यांनी त्यांचं काहीही न ऐकता गोंधळ सुरूच ठेवला. देशभरातून 'आदिपुरुष' सिनेमाला विरोध होत आहे. आता महाराष्ट्रातील हिंदू संघटनादेखील आक्रमक झाल्या आहेत. 


'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात मात्र यशस्वी ठरला आहे. आता या सिनेमावर होत असलेला विरोध लक्षात घेत आणि प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करत निर्मात्यांनी या सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार असल्याचं जाहीर केलं आहे. टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती आल्याचं म्हटलं जात आहे. 


'आदिपुरुष' सिनेमातील रावणाची भूमिका, हनुमानाच्या भूमिकेकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. पण सिनेमात रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिरेखा पाहून कॉन्ट्रोव्हर्सीला सुरुवात झाली आहे. तसेच हा सिनेमा अतिभव्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा पाहताना प्रेक्षक मात्र नाराज झालेले दिसून येत आहेत. 


संबंधित बातम्या


Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती