Adipurush Box Office Collection Day 1 : 'आदिपुरुष' (Adipurush) हा बहुचर्चित सिनेमा सध्या देशभरात चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेप्रेमी आणि प्रभासचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता हा सिनेमा प्रदर्शित झाला असून रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने दणदणीत कमाई केली आहे. 


'आदिपुरुष' हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये तब्बल 6,200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. फक्त हिंदीतच हा सिनेमा 4,000 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. हा बहुचर्चित सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळाली.


'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण तरीही हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेप्रेमींनी सिनेमागृहात पहाटेपासूनच गर्दी केली. पण सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी मात्र अपेक्षा भंग झाल्याचे सांगितले आणि या सिनेमातील व्हिएफएक्स, पात्रांचे कपडे, रावणाचा अवतार अशा वेगवेगळ्या गोष्टींवर टीका करायला सुरुवात केली. तर प्रभासच्या चाहत्यांनी मात्र ब्लॉकबस्टर 'आदिपुरुष' असं जाहीर केलं. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून काही मंडळींनी सिनेमा नेमका काय आहे हे पाहण्यासाठी पुन्हा सिनेमागृहात गर्दी केली. त्यामुळे 'आदिपुरुष'ला प्रेक्षकांची झुंबड उडाली असल्याचं दिसलं आणि याचाच परिणाम सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला. 


'आदिपुरुष' बॉक्स ऑफिस कलेक्शन... (Adipurush Box Office Collection) 


'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई करतो याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 86.50 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमा 150 कोटींचा टप्पा पार केला आहे. फक्त हिंदीमध्ये या सिनेमाने 45 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


'आदिपुरुष' या सिनेमाची 500 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात रामाच्या भूमिकेत प्रभास, सीता मातेच्या भूमिकेत कृती सेनन,  रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान, लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंह आणि हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे आहे. आता तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा वीकेंडला चांगलीच कमाई करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष' या सिनेमाची तिकीटे 2000 रुपयांपर्यंत विकली जात आहेत. वीकेंडला या तिकीट दरात आणखी वाढ होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'आदिपुरुष' या सिनेमावर नेटकऱ्यांनी प्रचंड टीका केली आहे. समीक्षकांनीही या सिनेमावर नाराजी व्यक्त केली आहे. पण तरीही बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने धमाका केला आहे.


संबंधित बातम्या


Adipurush Movie Review : अत्यंत निराशाजनक प्रभासचा 'आदिपुरुष'; वाचा रिव्ह्यू...