Adah Sharma on Sushant Singh Rajput : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) हा त्याच्या चित्रपटांमुळे आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. सुशांतने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्येकालाच धक्का बसला होता. त्यानंतर अनेक प्रकारचे वादही निर्माण झाले. अशीच एक कॉन्ट्रव्हर्सी झाली ती अदा शर्मा (Adah Sharma) ही सुशांतचं घर पाहायला गेली. तेव्हापासून अदा शर्माला बऱ्याच प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. अदा शर्मा सुशांत सिंहचं घर विकत घेणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु त्यावर अदाने मौन बाळगणं पसंत केलं होतं. 


पण आता अदाने नुकत्या दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. तसेच मी कुठे राहणार हे लवकरच तुम्हाला कळणार असल्याचंही तिनं म्हटलं आहे. त्यामुळे अदा सुशांतचं घर घेणार की नाही हा संभ्रम चाहत्यांच्या मनामध्ये अजूनही कायम आहे. अदा शर्मा ही नुकतची बस्तर या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्या चित्रपटामुळेही अदाला बरचं ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावरही अदाने या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 


अदा शर्मा सुशांत सिंह राजपूतचं घर विकत घेणार?


सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये अदाने यावर भाष्य केलं आहे. यामध्ये तिला विचारण्यात आलं की, तू सुशांत सिंह राजपूतचं घर विकत घेणार आहेस की नाही? यावर अदाने म्हटलं की, सध्या मी प्रेक्षकांच्या मनामध्ये राहतेय. या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी अजिबात घाबरत नाही. पण प्रत्येक गोष्ट सांगण्याची एक योग्य वेळ असते, ती आल्यावर लवकरच मी याबाबत सविस्तर बोलेन. 


'जेव्हा मी त्याचं घर पाहायला गेले तिथे मलाही थोडं बावरल्यासारखं झालं. कारण मला माझ्या वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवायला जास्त आवडतं. त्याचप्रमाणे जी व्यक्ती या जगात नाही, जिने तिच्या क्षेत्रात उत्तम काम केलं आहे, त्याच्याविषयी बोलणं हे फार चुकीचं आहे. एक अभिनेता म्हणून मी कायमच त्याचा आदर करेन. लोकांनी त्यावेळी मला ट्रोल केलं यापेक्षा त्याला ट्रोल केलं याचं मला जास्त वाईट वाटलं. पण मी जेव्हा माझ्या घरात राहायला जाईन अर्थात ते घर कोणतं असेल त्याविषयी मी तिथे राहायला गेल्यावर बोलनेच, पण सध्या मला प्रेक्षकांच्या मनात राहायला जास्त आवडेल',  असंही अदानं म्हटलं. 


ही बातमी वाचा : 


Kangana Ranaut : कंगनाच्या 'त्या' वक्तव्यामुळं वातावरण तापलं, आता कंगनानं स्पष्टीकरण देत ट्रोलर्सना झापलं; म्हणाली 'जे मला शिकवतायत त्यांनी...'