मुंबई : पाप, झहर यासारख्या चित्रपटातून गाजलेली अभिनेत्री उदिता गोस्वामी दुसऱ्यांदा आई झाली. उदिताने 21 तारखेला मुलाला जन्म दिला. उदिताचा पती आणि दिग्दर्शक मोहित सुरीने ही गोड बातमी शेअर केली.


आपल्या बाळाचं 'कर्म' असं नामकरण केल्याचं उदिताने गुरुवारी इन्स्टाग्रामवरुन सांगितलं. उदिताने शेअर केलेल्या जुन्या फोटोमध्ये गर्भावस्थेतील उदिता, मोहित आणि त्यांची मोठी मुलगी देवी दिसत आहेत.

गेल्याच आठवड्यात उदिताने मॅटर्निटी फोटोशूट शेअर करत चाहत्यांना धक्का दिला. उदिता गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असल्यामुळे तिच्याविषयी फारशी कोणाला माहिती नव्हती.


उदिता आणि मोहित सुरी 2013 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. तिची मोठी मुलगी देवीचा जन्म 2015 मध्ये झाला. मोहित सुरीने दिग्दर्शन केलेले मर्डर 2, आशिकी 2, एक व्हिलन, हमारी अधुरी कहानी, हाफ गर्लफ्रेण्ड असे चित्रपट प्रसिद्ध आहेत.

पूजा भट्टच्या 'पाप' चित्रपटातून 2003 साली उदिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत तिची सिझलिंग केमिस्ट्री गाजली होती. त्यानंतर ती मोहित सुरी दिग्दर्शित झहरमध्ये झळकली.

2012 मध्ये प्रदर्शित झालेला 'डायरी ऑफ अ बटरफ्लाय' हा तिचा अखेरचा चित्रपट. लग्नानंतर तिचं दर्शन मोठ्या पडद्यावर झालेलं नाही. त्यामुळे बाळंतपणानंतर ती बॉलिवूडमध्ये परतणार का, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.


चारच दिवसांपूर्वी अभिनेत्री नेहा धुपियाने मुलीला जन्म दिला. अंगद बेदी आणि नेहा मे महिन्यात विवाहबंधनात अडकले होते. नेहाने आपल्या मुलीचं 'मेहर' असं नामकरण केलं आहे.