Vignesh Shivan : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि निर्माता विग्नेश शिवन (Vignesh Shivan) चेन्नईच्या महाबलीपुरम येथील एका रिसॉर्टमधील एका भव्य समारंभात विवाहबद्ध झाले. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नाच्या एका दिवसानंतर नयनतारा विग्नेश शिवनसोबत आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात पोहोचली. मात्र, नवदाम्पत्य तेथे गेल्यानंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे. यामुळे विग्नेशला जाहीर माफी मागावी लागली आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनतारा पती विग्नेशसोबत भगवान व्यंकटेश्वराच्या कल्याणोत्सवात सहभागी होण्यासाठी मंदिरात पोहोचली होती. यादरम्यान ही जोडी माडा येथील रस्त्यावर चप्पल घालून फिरताना दिसल्याने येथे वाद निर्माण झाला आहे. मात्र, शिवनने याबाबत माफी मागणारे निवेदन जारी केले आहे.



नेमकं कारण काय?


या जोडप्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये नयनतारा चप्पल घालून मंदिराच्या परिसरात फिरताना दिसत आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाचे मुख्य दक्षता सुरक्षा अधिकारी नरसिंह किशोर यांच्या मते, मंदिराच्या आवारात चप्पल घालण्यास सक्त मनाई आहे. ते म्हणाले की, नयनतारा माडाच्या रस्त्यावर चप्पल घालून फिरताना दिसली. आमच्या सुरक्षा रक्षकाने ही गोष्ट पाहिली. त्यांनी मंदिराच्या आवारात फोटोशूट केल्याचेही आपण पाहिले आहे, ज्यावरही बंदी आहे. पवित्र मंदिरात खाजगी कॅमेऱ्यांना परवानगी नाही.


ते पुढे म्हणाले, 'आम्ही नयनतारा यांना नोटीस देणार आहोत. आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत आणि त्यांना भगवान बालाजी, टीटीडी आणि यात्रेकरूंची माफी मागणारा एक व्हिडीओ प्रेसमध्ये जारी करायचा होता. मात्र, आम्ही त्यांना नोटीस देणार आहोत.’


कारवाई करण्याची मागणी


मंदिराच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. त्याचवेळी, व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओंमध्ये कपल पारंपारिक ड्रेस परिधान करून दिसत आहे. नयनतारा पिवळी साडी परिधान केलेली दिसली, तर विग्नेशही पांढऱ्या पोशाखात दिसला. मंदिराच्या नियमांनुसार माडाच्या रस्त्यावर पादत्राणे घालून फिरण्यास सक्त मनाई आहे. यासाठी मंदिर प्रशासनाने अनेक ठिकाणी डिस्प्ले बोर्डही लावले आहेत.


साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी 9 जून 2022 रोजी चेन्नईच्या महाबलीपुरममध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केले. रजनीकांत, शाहरुख खान, दिग्दर्शक एटली यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या जोडप्याच्या लग्नाला हजेरी लावली होती.


हेही वाचा :


PHOTO : शुभ मंगल... सावधान! साऊथ अभिनेत्री नयनतारा अडकली विवाह बंधनात, पाहा फोटो


Nayanthara, Vignesh Shivan : आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडणार नयनतारा-विग्नेशचा विवाह सोहळा