Vikram BO Collection : सुपरस्टार कमल हासनचा 'विक्रम' (Vikram) कमाईच्या बाबतीत अनेक मोठे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज झाला आहे. 'विक्रम'ने पहिल्या आठवड्यातच जगभरात 250 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट आता हळूहळू 300 कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे. एकट्या तामिळनाडूमध्ये या चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कमल हासनचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
'पुष्पा', 'केजीएफ 2' आणि 'आरआरआर' नंतर आता कमल हसनचा 'विक्रम' चाहत्यांचे जबरदस्त मनोरंजन करत आहे. 'विक्रम'च्या माध्यमातून कमल हसन दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे. या चित्रपटासोबत अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित बिग बजेट चित्रपट सम्राट पृथ्वीराज प्रदर्शित झाला. अशा परिस्थितीत विक्रम बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करेल? हा प्रश्न बहुतेक चाहत्यांच्या मनात होता.
चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी
मात्र, 'विक्रम'ने भरपूर कमाई करून ‘सम्राट पृथ्वीराज’ला मागे टाकले आहे. कमल हासनसोबत अभिनेता विजय सेतुपती आणि फहाद फासिल यांच्या भूमिकेचेही चाहते कौतुक करत आहेत. हे तिघेही साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज सुपरस्टार आहेत आणि त्यांना पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी आहे. इतकेच नाही तर, सूर्यानेही या चित्रपटात छोटी भूमिका साकारली आहे. यामुळे या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे संकेत मिळाले आहेत.
पहिल्याच आठवड्यात 250 कोटींहून अधिकचा व्यवसाय!
व्यापार विश्लेषक रमेश बाला यांच्या माहितीनुसार, 'विक्रम'ने पहिल्या आठवड्यात 250 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. एकट्या तामिळनाडूमध्ये 100 कोटींचा व्यवसाय करण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे. केरळमध्ये 25 कोटींहून अधिक व्यवसाय करणारा ‘विक्रम’ हा पहिला तमिळ चित्रपट ठरला आहे. याच वेगाने कमाई सुरू राहिली, आणि हा चित्रपट यशस्वी ठरला तर, आगामी काळात हा चित्रपट आणखी अनेक मोठे ‘विक्रम’ आपल्या नावावर करू शकतो.
‘विक्रम 2’मधून होणार धमाल!
यापूर्वी अशी चर्चा रंगली होती की, कमल हासन 'विक्रम' या चित्रपटाच्या सिक्वेलची निर्मिती करत आहे, ज्यात अभिनेता सुर्या मुख्य भूमिकेत असेल. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आजे की, लोकेश कनगराज लवकरच एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे ज्यात कमल हासन प्रमुख भूमिकेत दिसणार असून, सुर्या, कार्ती हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुर्याच्या कॅमिओ भूमिकेबरोबरच, 'विक्रम'च्या क्लायमॅक्समध्ये कार्तीच्या व्हॉईस ओव्हर नेरेशनने लोकेश कनगराजच्या पुढच्या चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. आता या चित्रपटात राम चरण देखील दिसणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने चाहत्यांना आनंद द्विगुणित झाला आहे.
संबंधित बातम्या