पणजी : 'हवस' चित्रपट आणि 'कलियोंका चमन' सारख्या गाण्यातून प्रेक्षकांचं चित्त चोरणारी अभिनेत्री मेघना नायडूला चोरट्यांनी लुटलं आहे. मेघनाच्या गोव्यातील घरात राहणाऱ्या भाडेकरुंनी तिच्या घरातील लहान-सहान गोष्टीही चोरुन पोबारा केला.


मेघना नायडूने फेसबुकवरुन या प्रकाराची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे भाडेकरु म्हणून राहणाऱ्या दाम्पत्याचा फोटोही तिने शेअर केला आहे.

गोव्यातील कंडोलिम भागात मेघनाच्या मालकीचा बंगला आहे. आरोपींनी आपण मुंबईचे रहिवासी असून न्यूझीलंडमध्ये नोकरी करत असल्याचं सांगितलं होतं. बनावट आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देऊन त्यांनी घर भाड्यावर घेतलं. घरातील लहान-सहान गोष्टींपासून मौल्यवान वस्तू, इतकंच काय माझी अंतर्वस्त्र आणि सॉक्सही घेऊन एका रात्रीत ते पळाले, असं मेघनाने लिहिलं आहे.

माझी आणि माझ्या केअरटेकर ल्यूईस यांची कपड्यांची बॅग, स्पीकर त्यांनी पळवला. माझ्या केअरटेकरला 85 हजारांचा तर आणखी एका महिलेला 40 हजारांचा गंडा घातला, असा दावाही मेघनाने केला आहे.