Actor Suriya Interesting Facts : अभिनेता सूर्या याचा आज 49 वा वाढदिवस आहे. साऊथ स्टार सूर्या याची मोठी फॅन फॉलोईंग आहे. सूर्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आहे. तमिळ इंडस्ट्रीमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होते. उत्तम अभिनय आणि मेहनतीच्या बळावर सूर्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रसिद्धी मिळूनही पाय जमिनीवर असलेला अभिनेता अशी त्याची ओळख आहे. सूर्या सिंघम चित्रपटातून तो घराघरात पोहोचला. आज अभिनेता सूर्याच्या वाढदिवस निमित्त त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या.
अभिनेता सूर्याचं खरं नाव काय?
अभिनेता सूर्याछा देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. अनेकांना माहीत नसेल, पण सूर्या हे त्याचं खरं नाव नाही. फिल्म इंडस्ट्रीसाठी तो सूर्या हे नाव वापरतो. अभिनेता सूर्याचं मूळ नाव सर्वानन शिवकुमार आहे. सर्वानन या नावाचा आधीच एक अभिनेता असल्यामुळे तो सूर्या हे नाव वापरतो. त्याचा जन्म 23 जुलै 1975 रोजी मद्रास म्हणजे आताच्या चेन्नईमध्ये झाला. सूर्याचे वडील दाक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेते शिवकुमार आणि आईचं नाव लक्ष्मी. त्याचं शिक्षण चेन्नईमध्ये झालं. त्याने बीकॉम पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे.
अभिनेता नाही दिग्दर्शक व्हायची इच्छा
सूर्याला अभिनेता होण्याची इच्छा कधीच नव्हती. सूर्याला लहानपणापासून दिग्दर्शक व्हायचं होतं. अभिनेता शिवकुमार यांचा मुलगा असल्याने निर्मात्यांची नजर कायमच त्याच्यावर होती. 1995 मध्ये आसाई (Aasai) चित्रपटासाठी त्याला मुख्य भूमिकेची ऑफर मिळाली होती, पण अभिनयात रस नसल्याने त्याने ऑफर फेटाळली. त्यानंतर त्याने 1997 मध्ये पहिला चित्रपट केला.
वयाच्या 22 व्या वर्षी पदार्पण
अभिनेता सूर्याने 1997 मध्ये आलेला तमिळ चित्रपट नेरक्कू नेर (Nerukku Ner) वयाच्या 22 व्या वर्षी पदार्पण केलं. त्यानंतर 2001 मध्ये आलेल्या नंदा (Nandha) चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. 2004 मध्ये आलेला गझनी चित्रपटानेही चांगली कमाई केली. पण त्याला मोठी संधी 13 वर्षानंतर मिळाली.
सिंघम चित्रपटामुळे खरी प्रसिद्धी
सूर्याने 2010 मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या रक्त चरित 2 चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं, पण हा चित्रपट काही खास कामगिरी करू शकला नाही. 2010 मध्ये आलेल्या सिंघम चित्रपटामुळे त्याला खरा स्टारडम मिळाला. सिंघम सीरिजमुळे सूर्याला खरी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर 2013 मध्ये सिंघम चित्रपटाचा सिक्वेल आला, जो सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
कपड्याच्या फॅक्टरीमध्ये काम
अभिनेता सूर्या याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी कपड्याच्या कारखान्यात काम केलं आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी सूर्या एका गारमेंट फॅक्टरीमध्ये मॅनेजर म्हणून आठ महिने नोकरीला होता. अभिनेता शिवकुमार यांचा मुलगा असल्याची ओळख त्याने लपवून ठेवली होती. पण कंपनीच्या मालकापासून ही बाब जास्त काळ लपून राहू शकली नाही.