Johnny Lever Birthday: बॉलिवूडमध्ये आपला कोणताही गॉडफादर नसतानाही मागील चार दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर (Johnny Lever) आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहे. आंध्र प्रदेशातील कनिगिरी मध्ये 14 ऑगस्ट 1957 रोजी जॉनी लिव्हर यांचा जन्म झाला होता. जॉनी लिव्हर यांचा स्ट्रगल हा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. लोकांना पोट धरून हसवणार्या या अभिनेत्याच्या वाटेला अनेक दु:ख, हालअपेष्टा आल्या.
जॉनी लिव्हरचे खरं नाव...
जॉनी लिव्हरच्या अनेक लोकांना आणि चाहत्यांना त्याचे खरे नाव माहित नाही. जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे. त्यांचे नाव बदलण्यामागे एक रंजक कथा आहे.
18 व्या वर्षी जॉनी लिव्हर हे 'हिंदुस्थान लिव्हर' या कंपनीत कामाला लागले. सातवी नापास मुलाला जे काम मिळायचे तेच काम त्यांना मिळाले. झाडू मारणे फरशा पुसणे वगैरे कामे असायची. रसायनांचे ड्रम उघडण्याचे आणि ते साफ करून ठेवण्याचे काम जॉनी करायचे. पहिल्याच वेळी जॉनीने ड्रम उघडला व तो पुसला, त्यात डोके घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. त्याला गंमत वाटली. पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले. रोजच तसेकेल्यावर जॉनीलाजाणवले की त्याच्या नकलांच्या आवाजावर चांगला परिणाम होतोय. वेगवेगळे आवाज काढायचो. एका कामगाराने तक्रार केली. मग त्याच्या सुपरवायझरने त्याला जाब विचारण्यासाठी बोलावले. त्याला जॉनीने तऱ्हे-तऱ्हेच्या नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला आणि त्याने जॉनीला गेट्टुगेदरमध्ये संधी दिली. रंगभवनच्या त्याया संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून जॉनीने सारे सभागृह दणाणून सोडले. त्यानंतर जॉनी लिव्हर यांना कंपनीत चांगले काम मिळू लागले.
त्याशिवाय, जॉनी लिव्हर हे ऑर्केस्ट्रामध्येही काम करू लागले. गाण्यांच्या मध्यंतरादरम्यान जॉनी लिव्हर स्टँडअप कॉमेडी करत असे. या अशा कार्यक्रमातून चांगले पैसे मिळत असल्याने जॉनी यांनी सात वर्ष नोकरी केल्यानंतर कंपनीतून राजीनामा दिला.
वयाच्या 15 व्या वर्षी रस्त्यावर पेन विक्री केली...
जॉनी यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यांना आपला शालेय शिक्षणही पूर्ण करता आले नाही. सातवीत असताना घरच्या परिस्थितीमुळे जॉनी यांना शाळा सोडावी लागली. वयाच्या 15 व्या वर्षी रस्त्यावर पेन विकून आपला उदरनिर्वाह करत असे. त्यांच्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, 'मी तीन-चार महिने पेन विकले. माझ्या एका मित्राने मला पेन विकायला शिकवले. मी 15-16 वर्षांचा असताना कलाकारांच्या आवाजाची नक्कल करून पेन विकायचो. पूर्वी पेन विकून 25 ते 30 रुपये मिळायचे. मात्र, नंतर जेव्हा मी कलाकारांच्या आवाजात पेन विकायला सुरुवात केली तेव्हा मला 250 ते 300 रुपये मिळू लागले.
दारुच्या गुत्त्यावर केलं काम...
त्याशिवाय जॉनी यांनी बॉलिवूडमध्ये आपली कारकिर्द सुरू करण्यापूर्वी दारूच्या गु्त्त्यावरही काम केले. शाळेतून परत आल्यानंतर कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी ते काम करायचे. जॉनी लिव्हर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मी झोपडपट्टीत राहायचो आणि शाळेतून आल्यानंतर दारूच्या गुत्त्यावर काम करायचो. जे काही पैसे मिळायचे ते घरखर्चासाठी द्यायचे.
रेशनसाठी काकांकडून पैसे उधार घेतले...
अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्या The Icons या शोमध्ये जॉनी लिव्हरने सांगितले की, माझे वडील दारुच्या आहारी गेले होते. त्यांना घराची फारशी काळजी वाटत नव्हती. रेशनसाठी आम्ही काकांकडून पैसे मागायचो. मला खूप वाईट वाटायचे. सारखं-सारखं त्यांच्याकडून पैसे कसे मागायचे या विचाराने फार वाईट वाटायचे.
बॉलिवूडमध्ये पदार्पण...
वर्ष 1982 मध्ये जॉनी लिव्हरला अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत परदेश दौऱ्याची संधी मिळाली. त्यादरम्यान अभिनेता सुनील दत्त यांची नजर जॉनीवर पडली. सुनील दत्त यांनी जॉनीला त्यांच्या 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. यानंतर जॉनीने 80 आणि 90 च्या दशकात प्रेक्षकांची मने जिंकली. जॉनी लिव्हर हे चित्रपटात मिमिक्रीच करायचे. त्यांना अभिनयाची संधीच मिळत नव्हती. दिग्दर्शक एन. चंद्रांनी ‘तेजाब’मधून ती संधी दिली. अभिनय कसा करायचा, भूमिकेत रंग कसे भरायचे याचे मार्गदर्शन केले. जॉनी यांनी या संधीचे सोनं केले. पुढे मिमिक्री कलाकार असलेले जॉनी लिव्हर हे अभिनेते म्हणून नावारुपास आले. जवळपास 400 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
आपल्या सिने कारकिर्दीत जॉनी लिव्हर यांनी हत्या, बाजीगर, राजा हिंदुस्तानी, दुल्हे राजा, जुदाई, 'कुछ कुछ होता है', 'नायक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. जॉनी लिव्हर यांना दोनदा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.