मुंबई : जवळपास महिनाभर कोरोनाशी लढा दिल्यानंतर भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचं चंदीगडमधील रुग्णालयात निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून क्रीडा विश्वासह सामान्य नागरिक दु:ख व्यक्त करत आहेत. मिल्खा सिंह यांचा बायोपिक 'भाग मिल्खा भाग'मध्ये त्यांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता फरहान अख्तरने शोक व्यक्त केला आहे. 'मिल्खा सिंह या जगात नाहीत, यावर विश्वास बसत नाही,' अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
फरहान अख्तरने ट्वीट केलं आहे की, "प्रिय मिल्खा जी, तुम्ही आमच्यात नाही हे स्वीकारण्यास माझं मन अजूनही तयार नाही. कदाचित तुमच्यासारखचं माझं मन वागतंय आज, थोडंसं हट्टी, थोडं जिद्दी, जे मला तुमच्याकडून वारसाहक्काने मिळालंय. सत्य हे आहे की तुम्ही कायमच जिवंत आहात. कारण तुम्ही सहृदयी, प्रेमळ, साधे आहात. तुम्ही एका स्वप्नाचं प्रतिनिधित्व केलं. परिश्रम करुन प्रामाणिकपणा आणि दृढ निश्चयाने एखादी व्यक्ती आकाशाला गवसणी घालू शकते, याचं तुम्ही उदाहरण होता. यशानंतरची तुमची नम्रत आणि तुमचं जीवन अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे."
Milkha Singh Death : फ्लाईंग सिख मिल्खा सिंह यांचे निधन
"तुम्ही आम्हा सर्वांच्या आयुष्यावर छाप पाडली आहे. जे लोक तुम्हाला वडील आणि मित्राच्या रुपात ओळखतात, त्यांच्यासाठी हा एक आशीर्वाद होता. मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो," असं फरहान अख्तरने पुढे लिहिलं आहे.
'भाग मिल्खा भाग' हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. ओम प्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट फ्लाईंग सिख मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित होता. विशेष म्हणजे मिल्खा सिंह यांनी आपल्या आत्मचरित्राचे हक्क केवळ एक रुपयांना विकले होते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
मिल्खा सिंह यांचं निधन
भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांचे निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मिल्खा सिंह फ्लाईंग सिख (Flying Sikh) नावाने प्रसिद्ध होते. मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांना 19 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना चंदीगढच्या PGI रुग्णालयत भरती करण्यात आले. ऑक्सिजन लेव्हल 56 पर्यंत गेली होता जिथे काल (18 जून) रात्री 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन झालं होतं. परंतु आयसीयूमध्ये असल्याने पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना उपस्थितीत राहता आलं नाही.
मिल्खा सिंह यांची कारकीर्द
- फ्लाईंग सिख मिल्खा सिंह 1960 साली रोम ऑलिम्पिकमध्ये झालेल्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर होते.
- 200 मीटर आणि 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व
- 1958 च्या कार्डिफ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक
- अॅथलेटिक्समध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे खेळाडू
- आशियाई स्पर्धेत 4 सुवर्णपदक
- 1956, 1960 आणि 1964 सालच्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व
- 1960 च्या रोम ऑलम्पिकच्या 400 मीटरच्या अंतिम सामन्यात थोडक्यात पदक हुकलं
- 1959 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मान