पुणे : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण तरडे यांच्या गाडीला मंगळवारी (27 ऑगस्ट) रात्री 11 वाजता सासवडजवळ अपघात झाला आहे. अभिनेते रमेश परदेशी आणि कार्यकारी निर्माते विशाल चांदणे हे देखील त्यांच्यासोबत गाडीमध्ये होते. सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.


सासवडजवळ हिवरे गावात महादेव मंदिरासमोर प्रविण तरडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघात होताच गाडीतील एअर बॅग्स उघडल्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. सर्वजण सुखरुप आहेत. घटनेची माहिती मिळताच सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.



अपघातानंतर काही चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. मात्र प्रविण तरडे, रमेश परदेशी आणि विशाल चांदणे यांना काहीही झाले नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.


काल प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातात आनंद शिंदे यांच्या तळपायाला किरकोळ दुखापत झाली होती. मात्र गाडीच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला होता.