मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल 20 वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेत आहे. अर्जुन आणि मेहर जेसिया यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.


45 वर्षीय अर्जुन रामपाल आणि 47 वर्षीय मेहर जेसिया यांनी एकत्रितपणे स्टेटमेंट काढून घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला आहे.

'प्रेम आणि सुंदर आठवणींनी भरलेल्या 20 वर्षांच्या सुरेख प्रवासानंतर, आम्हाला सांगावंसं वाटतं की आता या प्रवासाच्या दिशा वेगवेगळ्या आहेत. दोघांनी वेगवेगळ्या दिशांना जाण्याची हीच योग्य वेळ आहे, असं आम्हाला वाटतं. नव्या प्रवासाला सुरुवात करतानाच, आम्ही एकमेकांसाठी आणि आमच्या प्रियजनांसाठी कायम सोबत असू, हे सांगू इच्छितो. नातं संपू शकतं, पण प्रेम नाही.' असं अर्जुन-मेहर यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

अर्जुन आणि मेहर यांनी 1998 मध्ये लगीनगाठ बांधली होती. त्यावेळी दोघंही जण मॉडेलिंग करत होते. त्यांना 16 वर्षांची महिका आणि 13 वर्षांची मायरा या दोन मुली आहेत.

काही वर्षांपासून अर्जुन आणि मेहर यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्यावेळी दोघांनीही हे आरोप फेटाळले होते. हृतिक रोशनची विभक्त पत्नी सुझान खानसोबत अर्जुनचं नाव जोडलं जात होतंं, मात्र अखेर चर्चांचा धुरळा खाली बसला.

अर्जुनने मॉडेलिंगनंतर 2001 मध्ये 'प्यार, इश्क और मोहब्बत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर दीवानापन, आँखे, दिल है तुम्हारा, दिल का रिश्ता, ओम शांती ओम, रॉक ऑन, राजनीती यासारख्या अनेक चित्रपटात तो झळकला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डॅडी सिनेमात त्याने साकारलेली 'डॉन अरुण गवळी' यांची भूमिका प्रचंड गाजली