बाटला हाऊस.. अगदी अलिकडे घडलेली घटना. म्हणजे साधारण दहा वर्षांपूर्वीची. 2008 मध्ये दिल्लीत बॉम्बस्फोट झाले. दिल्ली पोलीसांवरचं प्रेशर वाढलं. कुठून कुणाचे लागेबांधे होते ते कळेना. म्हणजे, स्फोटाची जबाबदारी इंडियन मुजाहिदीनने घेतली. पण पुढे त्याचे काय कनेक्शन्स आहेत कळायला मार्ग नव्हता. पोलिसांना धागेदोरे मिळत नव्हते. अटक झाली नव्हती. अशावेळी दिल्लीतले एसीपी संजीवकुमार (नाव बदललं आहे) यांच्याकडे येते आणि त्यांना सूचना मिळते की दिल्लीतल्या बाटला हाऊसमध्ये दहशतवादी लपलेले आहेत. आणि मग चकमक झडते. त्यात दोघे मारले जातात. एक हाती लागतो आणि एक पळून जातो. अगदी पोरसवदा वयाची मुलं असतात ती. विद्यार्थी.. पोलिसांवर आरोप होतो की हे एन्काउंटर बनावट आहे. मग पोलीसांची जबाबदारी येते की हे खंर होतं हे सांगण्याची. त्या केसवर दिग्दर्शक निखिल आडवानी यांनी सिनेमा बनवला आहे बाटला हाऊस.

या सिनेमाची गोष्ट अगदी डिटेल हवी असेल तर गुगलवर बाटला हाऊस टाकलं तरी सगळं कळेल. तर तीच गोष्ट यात आहे. फक्त 2012 मध्ये कोर्टाने दिल्ली पोलिसांना क्लीन चीट दिली. ती का? कोणत्या आधारे? हे या सिनेमातून कळतं. जॉन अब्राहम, म़णाल ठाकूर आदींच्या मुख्य भूमिका यात आहेत. निखिल आडवानी हे दिग्दर्शक आणि लेखक असल्यामुळे नेमकं काय घ्यायचं कसं घ्यायचं याची पूर्ण कल्पना त्यांना आहे. त्याचा या सिनेमाला फायदा झाला आहे.

हा सिनेमा फक्त त्या एका घटनेचा नाही. तर अर्थातच अल्पसंख्यांक समाजाची ही मुलं असल्यामुळे त्यातून होणारं राजकारण, पोलिसांवर येणारा दबाव.. आदी गोष्ट दिसतात. या सिनेमात चोख चकमक आहे. संघर्ष आहे. त्यामुळे सिनेमा पाहावा वाटतो यात शंका नाही. तरीही काही गोष्टीची उत्तरं मिळत नाहीत. उदाहरणार्थ.. एसीपीला झालेला डिसॉर्डर.. त्याला होणारे भास.. हे जरा नको तितकं सिनेमॅटिक वाटतं. शिवाय, शेवटी येणारा कोर्टरूम ड्रामाही तसा टिपिकल होतो. म्हणजे, पोलिसांवर बनावट अन्काउंटर केल्याचे आरोप होताना त्यात गेलेल्या वेल डेकोरेटेड पोलीस इन्स्पेक्टरचा उल्लेख आवश्यक तिथे होताना दिसत नाही. कोर्टरूम ड्रामामध्ये संजीवकुमारने वकिलाला गोळी कुठून गेल्यावर कुठून रक्त येतं हे सांगणं म्हणजे अगदीच बाळबोध वाटतं. असो. त्याचा उल्लेख अगदी शेवटी येतो. हे प्रश्न मनात असतानाच पुढे गोष्ट घडत जाते.

सिनेमाचं छायांकन, संगीत, अभिनय आदी तांत्रिक गोष्टी उत्तम आहेत. शिवाय, पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्द्ल आपल्याला अभिमानही वाटतो. ओव्हरऑल सिनेमा बघताना मजा येते. सिनेमा एंटरटेनिंग आहे. आणि सर्वांनी पाहण्यासारखा. पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत साडेतीन स्टार्स.