मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान फोटोग्राफर्सपासून दूर राहण्याचा शक्यतो प्रयत्न करतो. इतकंच नाही तर सोशल मीडियावर त्याचं अकाऊंट तर आहे, पण तो फारसा अक्टिव्ह नसतो. पण फेसबुकवर नुकताच पोस्ट केलेल्या एका फोटोवरुन त्याला ट्रोल करण्यात आला आहे.


आमीरने मुलगी ईरा खानसोबतचा एका मजामस्तीचा फोटो शेअर केला होता. दोघे एका गार्डनमध्ये खेळताना दिसत आहेत. मात्र काहींना आमीरचा हा फोटो आवडला नाही आणि त्यांनी या फोटोवर वाईट आणि अश्लील कमेंट्स करायला सुरुवात केली.

रमजानच्या महिन्यात आमीर खानला अशाप्रकारचा फोटो शेअर करायला नको होता, असं काहींचं म्हणणं आहे. काही नेटीझन्स मुलगी-वडिलांच्या नात्यावर अश्लील शेरेबाजी करुन टीका करत आहेत.

"अल्लाहला घाबर, मी तुझा आदर करतो. अभिनयाप्रती तुझं समर्पण आणि मेहनतीला तोड नाही. पण हे स्वीकारण्यासारखं नाही," अशी कमेंट एकाने केली आहे.



एक जण म्हणाला की, "आमीर सर थोडी तरी शरम बाळगा. ती तुमची मुलगी आहे. तिला रमजानच्या महिन्यात योग्य कपडे घालायला हवे."

"हा रमजानचा महिना सुरु आहे. मुस्लीम आहेस, थोडी शरम बाळग," असं एकाने म्हटलं आहे.