मुंबई : बॉलिवूडमध्ये सुवर्णकाळ गाजवलेली अभिनेत्री माधुरी दीक्षितने अखेर मराठी चित्रपटात पदार्पण केलं. माधुरीच्या मराठमोळ्या चाहत्यांना 'बकेट लिस्ट' चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहेच. त्यामुळे पहिल्या वीकेंडला या सिनेमाने भरघोस कमाई केली आहे.


माधुरीचा 'बकेट लिस्ट' 25 मे रोजी प्रदर्शित झाला. 409 स्क्रीन्सवर झळकलेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात 3 कोटी 66 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.

पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 96 लाख, दुसऱ्या दिवशी 1 कोटी 30 लाख, तर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 'बकेट लिस्ट'ने 1.40 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं.

VIDEO : माधुरीच्या 'बकेट लिस्ट'चा ट्रेलर रिलीज

'बकेट लिस्ट'मध्ये माधुरी ही 'मधुरा साने' या सर्वसामान्य गृहिणीच्या भूमिकेत आहे. मधुराला हृदय दान करणाऱ्या सईची बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा ध्यास मधुरा घेते. त्यानंतर काय होतं, हे मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं आहे.

माधुरीसोबत सुमित राघवन मुख्य भूमिकेत असून वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, इला भाटे, शुभा खोटे, रेणुका शहाणे, दिलीप प्रभावळकर, मिलिंद फाटक अशी कलाकारांची फौज या सिनेमात आहे.


विशेष म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूरही या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.

तेजस देऊस्करने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.
दार मोशन पिक्चर्स, डार्क हॉर्स सिनेमाज आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

'बकेट लिस्ट- माझी, तुमची.. आपल्या सगळ्यांची' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.