72 Hoorain : '72 हुरैन' (72 Hoorain) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या बाबतीत निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) कॅम्पसमध्ये या सिनेमाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले आहे. निर्मात्यांच्या या घोषणेने हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
जेएनयूच्या कॅम्पस '72 हुरैन'चं विशेष स्क्रीनिंग
वास्तविक जीवनावर आधारित सशक्त सिनेमांची घोषणा झाली तेव्हा ते सिनेमे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळेच आता '72 हुरैन' या सिनेमावरदेखील टीका होत आहे. दरम्यान निर्मात्यांनी हा सिनेमा 4 जुलै 2023 रोजी जेएनयूच्या कॅम्पसमध्ये प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.
'72 हुरैन' या सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात दाखवण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या मानसिक छळाच्या दृश्यांवर काश्मीरमधील काही राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. या राजकीय पक्षांच्या मते,"72 हुरैन' या सिनेमात मांडण्यात आलेल्या नकारात्मक गोष्टींमुळे एका विशिष्ट धर्माबाबत लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि याचा सामाजिक जडणघडणीवर विपरीत परिणाम होईल".
मौलाना साजिद रशीद खान यांनीदेखील '72 हुरैन' या सिनेमावर आक्षेप घेतला आहे. या सिनेमात धार्मिक गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जेएनयूमध्ये पार पडणाऱ्या '72 हुरैन' या सिनेमाच्या स्पेशल स्कीनिंगबद्दल बोलताना निर्माते म्हणाले की,"दहशतवादासारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. हे प्रकरण गांभीर्याने समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जेएनयूमध्ये या सिनेमाचं खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं आहे".
7 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार '72 हुरैन'
'72 हुरैन' हा सिनेमा 7 जुलै 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय पूरण सिंह (Sanjay Puran Singh) यांनी केलं आहे. तर गुलाब सिंह तवर, किरण डागर, अनिरुद्ध तवर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. '72 हुरैन' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या