72 Hoorain Box Office Collection Day 1 : '72 हुरें' (72 Hoorain) हा वादग्रस्त सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून त्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला आहे.
'72 हुरें'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (72 Hoorain Box Office Collection)
'72 हुरें' या सिनेमाचा 2019 साली आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (IFFI) प्रीमियर झाला होता. तसेच या सिनेमाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. पुरस्कार सोहळ्यांमध्ये बाजी मारलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतात या सिनेमाने फक्त 35 लाखांची कमाई केली आहे.
'या' 10 भाषांमध्ये '72 हुरैन' प्रदर्शित!
'72 हुरें' हा सिनेमा 7 जुलै 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. जवळपास 10 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. हिंदी, इंग्रजी, आसामी, बंगली, भोजपुरी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, पंजाबी, तामिळ आणि तेलुगू या भाषांचा यात समावेश आहे. अनिल पांडे आणि जुनैद वासीने या सिनेमाची कथा लिहिली असून संजय पूरन सिंह चौहान (Sanjay Puran Singh Chauhan) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
पवन मल्होत्रा आणि आमिर बशीर '72 हुरें' या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. रिलीजच्या पहिल्या दिवशीचे या सिनेमाचे आकडे खूपच निराशाजनक आहेत. वीकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करू शकतो, असे म्हटले जात आहे. प्रेक्षकांना या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. पण हा सिनेमा त्यांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे.
'72 हुरें'चं कथानक काय आहे? (72 Hoorain Movie Story)
'72 हुरें' या सिनेमाचं कथानक बिलाल (आमिर बशीर) आणि हाकिम (पवन मल्होत्रा) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. बिलाल आणि हाकिम गेट वे ऑफ इंडियावर दहशतवादी हल्ला करण्यासाठी येतात. दहशतवादी हल्ल्यामुळे जन्नत मिळते असं सांगण्यात आले आहे. निष्पाप लोकांना दहशतवादी त्यांच्या जाळ्यात कसे अडकवतात याचं चित्रण '72 हुरैन'मध्ये करण्यात आलं आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाची प्रतीमा चुकीची दाखवल्याने निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
संबंधित बातम्या