National Film Awards 2023 : 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (69th National Film Awards) आज पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते आज विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. अनेक मराठी चित्रपटांचा देखील या पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला आहे. 


'एकदा काय झालं!' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट 


गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट मांडणाऱ्या 'एकदा काय झालं' (Ekda Kaay Zala)  या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक सलील कुलकर्णीनं द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.  सलील कुलकर्णीनं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे.  त्यानं पोस्टमध्ये लिहिलं,  "हा पुरस्कार तुमचा आहे. अगदी माझ्या लहानपणापासून माझ्या पावलांना काही खुपू नये म्हणून माझ्या प्रत्येक पावलाखाली तिचा तळवा ठेवत आलेली माझी आई आणि  ज्यांनी उद्याकडे बघायला कारण दिलं. ज्यांच्यामुळे प्रत्येक नवीन दिवस खऱ्या अर्थाने उजाडतो. ते शुभंकर आणि अनन्या"






निखिल महाजन ठरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक  


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात निखिल महाजन (Nikhil Mahajan) याला 'गोदावरी' (Godavari) या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. निखिल महाजननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन गोदावरी चित्रपटाच्या टीमचे आभार मानले. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं,"टीम गोदावरी तुमचे आभार! हे तुमच्यासाठी आहे."






'रेखा' लघुपटानं कोरलं राष्ट्रीय पुरस्कारावर नाव


दिग्दर्शक शेखर बापू रणखांबेच्या (Shekhar Bapu Rankhambe) 'रेखा' (Rekha) या लघुपटाला 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात नॉन फिक्शन कॅटेगरीमध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्डनं गौरवण्यात आलं.  राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर आता शेखर बापू रणखांबे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



इतर महत्वाच्या बातम्या:


69th National Film Awards : 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा, अल्लू अर्जुन, आलिया भट्टसह अनेक कलाकारांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान