मुंबई : क्रेझी फॅन्स आपल्या आवडत्या कलाकारासाठी काय करतील, याचा नेम नाही. अभिनेता संजय दत्तच्या चाहतीने तर आपली दौलतच संजूबाबावर उधळून टाकली. 62 वर्षीय निशी त्रिपाठी यांनी मृत्यूपूर्वी आपल्या सेफ डिपॉझिटमधील रक्कम संजय दत्तच्या नावे केली.
संजय दत्तच्या मनाचा मोठेपणा म्हणजे त्याने यातील एका पैसाही घेण्यास नम्रपणे नकार दिला आहे. 'बँक ऑफ बडोदा'च्या मुंबईतील वाळकेश्वर शाखेला पत्र लिहून ही रक्कम त्रिपाठी कुटुंबाला हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे. 'मुंबई मिरर' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
निशी त्रिपाठी कोण आहेत, याची पुसटशी कल्पनाही संजय दत्तला नव्हती. 29 जानेवारी 2018 रोजी पोलिसांनी संजयला फोन केला. '15 दिवसांपूर्वी निशी यांचं निधन झालं असून त्यांनी आपल्या बँक खात्यातील रक्कम आणि बँक लॉकरमधील ऐवज तुमच्या नावे केला आहे.' असं पोलिसांनी संजय दत्तला त्यावेळी सांगितलं.
निशी या संजय दत्तच्या इतक्या मोठ्या चाहत्या आहेत, हे त्रिपाठी कुटुंबालाही त्यांच्या मृत्यूनंतरच समजलं. निशी यांनी बँकेला लिहिलेली पत्रं समोर आल्यावर त्रिपाठी कुटुंबालाही धक्का बसला.
कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्यामुळे निशी त्रिपाठींचं लॉकर अद्याप उघडण्यात आलेलं नाही. मात्र निशींचा पैसा किंवा संपत्ती याच्याशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही, ती संपत्ती त्रिपाठी कुटुंबालाच मिळायला हवी, असं संजय दत्तने आपले वकील सुभाष जाधव यांच्या माध्यमातून कळवलं आहे.
निशी त्रिपाठी यांचं दीर्घ आजाराने 15 जानेवारी रोजी निधन झालं. त्या गृहिणी होत्या. 80 वर्षीय आई शांती आणि अरुण, आशिष, मधू या भावंडांसोबत त्या राहत होत्या. मलबार हिलमधील त्रिवेणी अपार्टमेंटमधल्या थ्री बीएचके फ्लॅटमध्ये त्रिपाठी कुटुंब राहतं. हा फ्लॅट जवळपास अडीच हजार चौरस फूटांचा असून त्यांची बाजारभावानुसार किंमत 10 कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
निशी यांच्या निधनानंतर गिरगावातील भारतीय विद्या भवनात शांतीसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. निशी यांनी आपली संपत्ती संजय दत्तच्या नावे केल्याची माहिती कुटुंबाच्या कायदेशीर सल्लागाराने शांतीसभेच्या दुसऱ्या दिवशी दिली. त्रिपाठी कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता.
निशी यांनी मृत्यूच्या काही महिने आधी बँकेकडे नामांकन अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये 'फिल्मस्टार संजय दत्त' असा उल्लेख असून त्याचा पाली हिलमधील पत्ता लिहिला आहे. कुटुंबाने याबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला आहे.
62 वर्षीय चाहतीकडून बँकेतील सर्व रक्कम संजय दत्तच्या नावे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Mar 2018 10:45 AM (IST)
अभिनेता संजय दत्तने 'बँक ऑफ बडोदा'च्या मुंबईतील वाळकेश्वर शाखेला पत्र लिहून ही रक्कम त्रिपाठी कुटुंबाला हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -