bollywood : बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार्स झाले आहेत ज्यांनी आपल्या करिअरमध्ये चढ-उतार अनुभवले आहेत. मग ते अमिताभ बच्चन असोत, सलमान खान असोत किंवा शाहरुख खान. पण एक असा हिरोही आहे ज्याने सलग 14 अपयशी चित्रपट दिले आणि नंतर सनी देओल व अजय देवगन यांच्या सिनेमातील भूमिका हिसकावून घेतली. पुढे तो सिनेमा हिट ठरला. कधीकाळी त्याने एका दिग्दर्शकासोबत 100 चित्रपट करण्याचं वचन दिलं होतं. पण नंतर अशी वेळ आली की या अभिनेत्याने त्या दिग्दर्शकाशी तब्बल 20 वर्ष संवादही साधला नाही.
आपण बोलत आहोत अक्षय कुमारबद्दल. त्याने आपल्या करिअरमध्ये यश आणि अपयश दोन्ही टप्पे पाहिले आहेत. 1991 मध्ये ‘सौगंध’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या अक्षय कुमारला 'खिलाडी' चित्रपटामुळे एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर 'खिलाडियों का खिलाड़ी', 'संघर्ष' यांसारखे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. पण नंतर असा एक काळ आला की अक्षय कुमार अपयशी चित्रपटांच्या जाळ्यात अडकले. परिणामी, निर्माते आणि दिग्दर्शक त्यांना काम देणं थांबवू लागले. अशा वेळी दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी त्यांना साथ दिली. त्यांनी अक्षयला ‘जानवर’ चित्रपटासाठी निवडलं आणि तिथून अक्षयचं पुनरागमन झालं.
एका मुलाखतीत सुनील दर्शन यांनी खुलासा केला होता की अक्षय कुमारने त्यांच्याकडे विनंती करत ‘जानवर’मध्ये घेतं यासाठी खूप आग्रह केला होता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, “अक्षय कुमार त्या टप्प्यावर होते जेव्हा त्यांना चित्रपट मिळणं थांबलेलं होतं. 13–14 अपयशी चित्रपटांनंतर ते पूर्णपणे रिकामे झाले होते. त्यांना समजत नव्हतं की पुढे काय करावं.”
सुनील दर्शन पुढे म्हणाले की, “त्यावेळी मी ‘जानवर’ची स्क्रिप्ट सनी देओलसाठी लिहीत होतो. पण काही गैरसमजुतीमुळे सनीसोबत ते काम पुढे जाऊ शकलं नाही. मग मी अजय देवगनसोबत काम करायचं ठरवलं. त्यांच्याशी संपर्क साधला आणि अजय त्या भूमिकेसाठी खूप उत्साही होते.”
“तेवढ्यात अक्षय कुमारने मला फोन केला. तेव्हा मी त्यांच्यासोबत काम करायला तयार नव्हतो. पण त्यांनी मला भेटायला यायला सांगितलं. आम्ही चित्रपटाविषयी चर्चा केली. मला जाणवलं की हा माणूस खूपच हुशार आहे. तो खूप शिस्तबद्ध वाटला. पण एक नकारात्मक गोष्ट होती की तो ‘बिकाऊ’ नव्हता.”
सुनील दर्शन म्हणाले, “जोपर्यंत एखादा स्टार यशस्वी असतो, तोपर्यंत इंडस्ट्री त्याचा आदर करते. पण एकदा का अपयशी झाला, की कोणी त्याला विचारतही नाही. त्यामुळे मी अक्षय कुमारला घेण्याचा निर्णय घेतला.” त्यानंतर त्यांनी त्या काळातील टॉप अभिनेत्री करिश्मा कपूरला घेऊन ‘जानवर’ बनवला, जो 1999 मध्ये प्रदर्शित झाला आणि हिट ठरला.
यानंतर सुनील दर्शन आणि अक्षयने एकत्र 6 चित्रपट साइन केले, जसे की – ‘एक रिश्ता’, ‘तलाश’, ‘दोस्ती’, ‘मेरे जीवन साथी’ आणि ‘अंदाज’. सुनील दर्शन म्हणाले, “आम्ही एकत्र 7 चित्रपट केले. आमचा शेवटचा चित्रपट ‘दोस्ती’ होता. तब्बल 7 वर्षं अक्षय माझ्याच ऑफिसमधून काम करत होते. मी नेहमी त्याचं भलं पाहिलं. ज्या वेळेस पूर्ण इंडस्ट्रीने त्याला नाकारलं होतं, त्यावेळी मी त्याला साथ दिली. मला आनंद आहे की अक्षयने नेहमी स्वतःच्या अटींवर काम केलं.”
‘जानवर’च्या यशानंतर अक्षय कुमारने दिलेलं वचन आठवत, सुनील दर्शन म्हणतात, “एक दिवस तो मला त्याच्या गाडीत घेऊन गेला. म्हणाला, ‘सर, मला कळलं आहे की तुम्ही पुढचा चित्रपट प्लॅन करत आहात आणि दुसऱ्या हिरोला घेण्याचा विचार करत आहात. कृपया दुसऱ्याला घेऊ नका. याचा माझ्या करिअरवर परिणाम होईल.’ त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, ‘सुनीलजी, मी तुमच्यासोबत 100 चित्रपट करणार, हे माझं वचन आहे.’”
सुनील दर्शन म्हणतात, “एका अभिनेत्यासोबत सात चित्रपट करणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. जेव्हा मी अक्षयसोबत सहावा चित्रपट करत होतो, तेव्हा त्याच्यात काही बदल जाणवू लागले. हे सगळं पाहून मी मागे होण्याचा निर्णय घेतला. एक काळ होता जेव्हा आम्ही दोघं मित्र होतो. पण आज अशी वेळ आहे की गेल्या 20 वर्षांपासून आम्ही एकमेकांशी भेटलेलोही नाही.” सुनील दर्शन शेवटी म्हणाले की, “मी शेवटचं अक्षय कुमारला 2005 मध्ये भेटलो होतो. त्यानंतर आम्ही कधीच भेटलो नाही. कदाचित त्याने एक-दोन वेळा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असतील.”
इतर महत्त्वाच्या बातम्या