मुंबई : हिमाचल प्रदेशातील खासदार राम स्वरुप शर्मा यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत त्यांच्या शासकीय निवासस्थानी सापडला. ज्यानंतर एकच खळबळ माजली. याचदरम्यान आणखी एका चर्चेनंही डोकं वर काढलं. ही चर्चा होती, अभिनेत्री कंगना रणौत हिच्या राजकीय प्रवेशाची.
मंडी या मतदारसंघातून कंगनाला भाजपच्या वतीनं निवडणूक लढवण्यासाठीची संधी दिली जाऊ शकते अशा चर्चांनी आता जोर धरला आहे. राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक Dr. Chiguru Prashanth यांनीही ट्विट करत याबाबतची शक्यता वर्तवली. पण, तिथं कंगनानं मात्र या सर्व चर्चा तथ्यहीन असल्याचं स्पष्ट केलं.
आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरत नसल्याचं तिनं सांगितलं. राजकारणात प्रवेश करण्यासाठी वेगळ्याच पर्यायाला पसंती दिली. कंगनाच्या मते हिमाचलमध्ये गरिबी आणि गुन्हेगारीच नाही. Dr. Chiguru Prashanth यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत तिनं लिहिलं, 'मला 2019 मध्ये ग्वाल्हेर लोकसभा निवडणुकीसाठी संधी मिळाली होती. हिमाचल प्रदेशची लोकसंख्या अवघी 60/70 लाख इतकीच आहे. गरिबी नाही आणि गुन्हेगारीही नाही'. राजकारणात आलेच तर, आपल्याला अशा ठिकाणहून निवडणूक लढवायची आहे, जिथं अनेक समस्या असतील. या क्षेत्रातही आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा मनसुबा तिनं या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला. इतक्यावरच न थांबता तिनं आपल्या राजकीय प्रवेशाबाबतच्या चर्चांना वाव देणारं ट्विट करणाऱ्या Dr. Chiguru Prashanth ना निशाण्यावर धरलं.
गेल्या काही काळापासून शेतकरी आंदोलन आणि बी- टाऊममधील इतर सेलिब्रिटींशी असणाऱ्या वादांमुळं कंगना सर्वांचं लक्ष वेधत आहे. हिंदी कलाविश्वातील अनेक प्रस्थापितांना तिनं सातत्याने निशाण्यावर घेतलं आहे.