Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात घुसून चोरट्यानं त्याच्यावर चाकूहल्ला केला. सैफच्या घरात घुसून त्याच्यावर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं. 16 जानेवारीला मध्यरात्री सैफवर हल्ला करण्यात आला. त्याच्यावर अनेकदा चाकूनं वार करण्यात आले. त्यानंतर त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आणि त्याच्या मणक्याजवळून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढला. तब्बल पाच दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर मंगळवारी (21 जानेवारी) सैफला डिस्चार्ज देण्यात आला. सैफच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, याप्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून सैफ अली खानच्या घराची झाडाझडती सुरू असून पोलीस पुरावे गोळा करत आहेत. या तपासादरम्यान, आरोपीनं सैफवर हल्ला केला त्यावळी चेहऱ्यावर लावलेलं मास्क पोलिसांना सैफचा लहान मुलगा जेहच्या खोलीत सापडलं होतं.
सैफच्या घरात सापडलं आरोपीचं मास्क
सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना सैफचा मुलगा जहांगीरच्या खोलीत आरोपी शहजादनं लावलेलं मास्क आढळलं. जेहच्या खोलीतच सैफ आणि आरोपीमध्ये झटापट झाली होती. पोलिसांनी मास्क आणि आरोपीचे केस डीएनए चाचणीसाठी स्कूल ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनकडे पाठवले आहेत. पोलिसांनी पुरावा म्हणून सैफच्या घरातून आरोपीचे 19 बोटांचे ठसे सापडले आहेत.
पोलिसांकडून सैफच्या घरात क्राईम सीनचं रिक्रिएशन
पोलिसांनी काल (मंगळवार, 21 जानेवारी) आरोपीला सैफ अली खानच्या घरी नेलं आणि क्राईम सीन्सचं रिक्रिएशन केलं. यावेळी आरोपी शहजादनं सांगितलं की, त्यानं इमारतीतील अनेक फ्लॅट्सच्या डक्ट तपासल्या, पण डक्ट सील केल्यामुळे आणि इतर फ्लॅट्सचे सर्व दरवाजे बंद असल्यानं तो दुसऱ्या कुणाच्याच घरात प्रवेश करू शकला नाही. यावेळी त्याला संपूर्ण इमारतीत फक्त सैफ अली खानच्याच घराता मागचा दरवाजा उघडा असल्याचं आढळलं. आरोपीनं सांगितलं की, तो सैफ अली खानच्या घरात घुसला आहे, हे त्याला माहीत नव्हतं. सकाळी बातम्या पाहिल्यानंतर त्याला कळालं की, तो प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरला आहे. यादरम्यान, इमारतीच्या मुख्य दरवाजाचे सीसीटीव्ही बंद असल्याचंही उघड झालं. पण काही फ्लॅट्सचे खाजगी सीसीटीव्ही काम करत होते. त्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी स्पॉट झाला.
सैफच्या घराची सुरक्षा वाढवली
सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेत्याच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. त्याच्या घरात अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सध्या वायरिंगचं काम सुरू आहे. यासोबतच एसी डक्ट बंद करण्याचं कामही सुरू आहे. सैफ घरी पोहोचताच त्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचललीत. सैफनं त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी अभिनेता रोनित रॉयच्या सुरक्षा एजन्सीकडे सोपवली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :