Black Panther Director Arrested : अ‍ॅव्हेंजर्स सिरीजमधील 'ब्लॅक पँथर' (Black Panther) चित्रपटाचा दिग्दर्शक रायन कूगलर (Ryan Coogler) यांना बँक लुटल्याच्या आरोपावरून अटलांटा पोलिसांनी अटक केली होती. आधी त्यांना लुटीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते, परंतु नंतर चुकून झाल्याचे सांगत सोडण्यात देखील आले. हे प्रकरण बँक ऑफ अमेरिकामध्ये घडले होते आणि पोलिसांनी चुकून दिग्दर्शक रायन कूगलरला दरोडेखोर समजले होते.


'व्हरायटी' वेबसाईटच्या बातमीनुसार, रायन कूगलर यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जानेवारी महिन्यात ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. ‘माझ्या सोबत असे कधीच घडले नाही. पण बँक ऑफ अमेरिका माझ्याशी बोलली, माफी मागितली आणि मी त्यांच्या वागण्यावर समाधानी आहे. हे विसरून आता आपण पुढे जायला हवं’, असे रायन कूगलर म्हणाले.


टोपी,चष्मा अन् मास्कने केला घात!


अटलांटा पोलिसांच्या अहवालानुसार, 7 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. चित्रपट निर्माते रायन बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना केवळ ताब्यात घेतले नाही, तर त्यांना हातकड्याही घालण्यात आल्या होत्या. यादरम्यान रायनने टोपी घातली होती. त्याच्या डोळ्यांवर चष्मा होता आणि कोविड-19 संसर्गाचा धोका लक्षात घेऊन त्याने फेस मास्क देखील लावला होता.


पोलिस अहवालात घटनेचा संपूर्ण उल्लेख आहे. त्यानुसार रायन बँकेच्या काउंटरवर पोहोचले आणि पैसे काढण्यासाठी स्लिप पुढे केली. त्यावर लिहिले होते की, त्यांना त्यांच्या खात्यातून $12,000 (सुमारे 9 लाख रुपये) काढायचे आहेत. तसेच, त्याला त्याची ओळख गुप्त ठेवायची असल्याने कृपया पैसे इतरत्र मोजावे, ​​असे स्लिपवर लिहिले होते.


...आणि अलार्म वाजू लागला!


नियमानुसार, बँकेतील पैसे काढण्याची रक्कम 10 हजार डॉलर्सच्या पुढे गेली की, अलार्म वाजतो. काउंटरवर बसलेल्या बँकरने अलार्मला काहीतरी वेगळंच समजलं. तो घाबरला आणि त्याने आपल्या अधिकाऱ्याला सांगितले की, बँक लुटली जात आहे. यानंतर पोलिस तेथे आले. पोलिस तेथे पोहोचले असता, त्यांना बँकेच्या बाहेर काळ्या रंगाची आलिशान लेक्सस एसयूव्ही कार उभी असलेली दिसली. गाडीचे इंजिन चालू होते आणि आत दोन लोक बसले होते. त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष होते.


पोलिसांनी कारमधील दोघांची चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की, ते चित्रपट निर्माता रायन कूगलरची वाट पाहत होते. पोलिसांनी त्यांना चित्रपट निर्मात्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल विचारले. हा देखावा अगदी तसाच होता, जो बँकेतील दरोडेखोर असल्याचे बोलले जात होते. पोलिसांनी तात्काळ रायन कूगलरच्या साथीदारांना दरोड्यातील साथीदार म्हणून ताब्यात घेतले. तथापि, बँक ऑफ अमेरिकामध्ये रायन कूगलरची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी नंतर त्याला आणि त्याच्या साथीदारांना सोडून दिले.


बँकेने माफी मागितली!


पोलिस अहवालात असे म्हटले आहे की, या घटनेनंतर रायन कूगलरने सर्व पोलिसांना त्यांची नावं आणि बॅज क्रमांक विचारले. बँक ऑफ अमेरिकानेही यासंदर्भात व्हरायटीला निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, 'अशी घटना घडल्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. आधी असे कधीच घडले नाहीय. आम्ही रायन कूगलरची माफी मागतो.'


सध्या रायन कूगलर त्यांच्या 'ब्लॅक पँथर' चित्रपटाच्या सिक्वेल 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर'साठी अटलांटामध्ये शूट करत आहे. हा चित्रपट या वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha