Raj Thackeray Biopic : आतापर्यंत रुपेरी पडद्यावर विविध व्यक्तींचे जीवनपट उलगडणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहेत. राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांचा जीवनपट या बायोपिकच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता, महाराष्ट्राच्या राजकारणात आपले वेगळं स्थान निर्माण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे राज ठाकरे यांच्या या बायोपिकच्या चर्चांना उधाण आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini pandit) करणार असल्याची चर्चा आहे. 


सध्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती दिसत आहे. राज ठाकरे यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तीला अभिनेत्री तेजस्विनी पंडित काही सूचना करताना दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून राज ठाकरे यांच्या बायोपिकची चर्चा रंगली होती. आता, व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे आता चर्चांना आणखीच उधाण आले आहे.  






 


राज यांची भूमिका कोण साकारणार?


राज ठाकरे यांच्यावरील बायोपिकमध्ये कोणता कलाकार त्यांची भूमिका साकारणार याची चर्चा रंगली आहे. याआधी राज यांच्याशी साधर्म्य दाखवणाऱ्या व्यक्तीरेखेत राजेश श्रृंगारपुरे दिसले होते. मात्र, या चित्रपटात कोणता कलाकार ही भूमिका साकारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ⁠त्याशिवाय, या चित्रपटातील इतर स्टारकास्टबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. 


अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने यापूर्वी अनेकदा सोशल मीडियावर राज ठाकरे यांनी विविध प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. तिच्या ट्वीटने अनेकांनी तिचे कौतुक केले होते. तर, टीकाही सहन करावी लागली होती. 






चित्रपटाची कथा काय?


राज ठाकरे यांनी  शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सावलीत आपला राजकीय प्नवास सुरू केला होता. बालवयापासूनच राज हे बाळासाहेबांसोबत राज्याच्या दौऱ्यावर असायचे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष स्थापन केला. राजकीय क्षेत्रात चौफेर फटकेबाजी करणारे राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार, कलाप्रेमी आहेत. त्यामुळे त्यांच्या बायोपिकमध्ये कोणत्या घटना असणार, राजकीय गौप्यस्फोट होणार का, याकडे सिने आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.