Vishal Nikam New Serial : कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 3) तिसरा सिझन प्रचंड गाजला. या पर्वात विशाल निकम (Vishal Nikam) याने संपूर्ण महाराष्ट्राची मने पुन्हा एकदा जिंकली. त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि तो या पर्वाचा महाविजेता ठरला. ‘बिग बॉस मराठी’ संपल्यानंतर आता विशाल निकम कोणत्या नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची चाहत्यांना उत्सुकता होती.


आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून, विशाल लवकरच नव्या भूमिकेत आपल्याला भेटायला येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई मायेचं कवच’ (Aai Mayecha Kavach) या मालिकेमध्ये लवकरच त्याची एण्ट्री होणार आहे. मालिकेतील त्याचा लुक कसा असेल, त्याचे पात्र काय असेल, हे नुकतेच समोर आले आहे. विशाल मालिकेत ‘मानसिंग’ नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. आता हा मानसिंग नक्की कोण आहे? त्याचा काय हेतु आहे? हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.



ठरवलं होतच की, प्रेक्षकांचं मनोरंजन करणार!


अभिनेता विशाल निकम याबद्दल बोलताना म्हणाला की, ‘बिग बॉस मराठीनंतर अॅक्टिंग पुन्हा एकदा सुरू होते आहे, त्याबद्दल आनंद आहे. बिग बॉस मराठी संपल्यानंतर ठरवलं होतं की, प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेन आणि आज त्यादिशेने पहिले पाऊल उचलले आहे. खूप मोठी जबाबदारी आहे. मानसिंग हे पात्र आजपर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळे असे पात्र आहे, आव्हानात्मक आहे.’


मानसिंग प्रत्येकाच्या मनात छाप सोडून जाईल!


‘मालिकेत उत्तम कलाकार आहेत आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे. कलर्स मराठीसोबत पुन्हा जोडला जातो आहे, या गोष्टीचा आनंद आहे आणि खूप उत्सुकता देखील आहे. मानसिंग प्रत्येकाच्या मनात छाप सोडून जाईल असाच माझा प्रयत्न असेल आणि तितकी मेहनत मी घेणार हे नक्कीच’, असे देखील विशाल म्हणाला.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha