Avatar 2 Leaked:  सिने-दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन (James Cameron) तेरा वर्षांनंतर सुपरहिट 'अवतार'चा (Avatar) दुसरा भाग घेवून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा चित्रपट शुक्रवारी भारतात प्रदर्शित होत आहे. मात्र याआधी अवतार टीमला एक धक्का बसला आहे.  रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट लीक झाल्याची माहिती काही वेबसाईट्सनी दिली आहे. हा चित्रपट आता टॉरेंट साइट्स आणि इतर पायरसी नेटवर्कवर 600MB ते 4GB पर्यंतच्या साईजमध्ये उपलब्ध होत असल्याचं दिसून आलं आहे. 


 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. अवतार लीक झाल्यानंतर गुरुवारी म्हणजे आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टोरेंट साइटवर लीक झाल्याचं दिसून आलं.  सिनेमागृहांमध्ये व्हिडिओ कॅमेऱ्याने हा लीक झालेला भाग चित्रित करण्यात आलं असल्याचं दिसून आल्याचं वृत्त आहे.  


लीक झालेल्या कॉपीची कॅमेरा क्वालिटी अत्यंत खराब
 
Disney, 20th Century Studios आणि Avatar: The Way Of Water च्या कलाकार आणि टीमसाठी दिलासादायक बाब हीच आहे की, लीक झालेल्या कॉपीची कॅमेरा क्वालिटी अत्यंत खराब आहे.  अवतार 2 चित्रपट बुधवारी बेल्जियम, डेन्मार्क, इजिप्त, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, इंडोनेशिया, इटली, नेदरलँड, दक्षिण कोरिया आणि स्वीडनमध्ये प्रदर्शित झाला. गुरुवारी ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इस्रायल, मेक्सिको, पोर्तुगाल, सिंगापूर आणि थायलंडमध्ये प्रदर्शित झाला. आता उद्या, शुक्रवारी भारत, यूएस, यूके, चीन, जपान आणि जगभरात प्रदर्शित होणार आहे.  


सिनेमाच्या सिक्वेलची चाहत्यांना उत्सुकता


'अवतार' हा सिनेमा 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा अॅनिमेशन सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून या सिनेमाच्या सिक्वेलची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. 'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. सॅम वर्थिंग्टन (Sam Wothington) जेक सुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. जो सलदानादेखील (Zoe Saldana) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विन्सलेट रोनलची भूमिका साकारत आहे. जिओव्हानी रिबिसी, जोएल डेव्हिड मूर, दिलीप राव, मॅट जेराल्ड, जॅक चॅम्पियन, एडी फाल्को, ब्रेंडन कॉवेल, मिशेल येओह आणि जेमेन क्लेमेंट हे कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.