Prashant Damle : हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, वाळवी या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅट्रिकनंतर मधुगंधा कुलकर्णी (Madhugandha Kulkarni) आणि परेश मोकाशी (Paresh Mokashi)'मु.पो. बोंबिलवाडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या सिनेमात हिटलर कोण होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. पण या प्रश्नाचं उत्तर आता प्रेक्षकांना मिळालं असून प्रशांत दामले (Prashant Damle) हिटलरच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


तीन लागोपाठच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या परेश मोकाशी यांचा हा चित्रपट असल्याने रसिकांमध्ये जी उत्कंठा लागून राहिली आहे, ती हिटलरच्या भूमिकेत प्रशांत दामले असल्याचे जाहीर झाल्याने आता दुपटीने वाढली आहे.हिटलरचा शोध घेण्यासाठी खरे तर प्रेक्षकांचा कल घेण्यात आला आणि त्याला भरघोष  प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर यांचीही नावे या स्पर्धेत पुढे होती. मात्र अंतिमतः शिक्कामोर्तब झाले ते, प्रशांत दामले यांच्या नावावर.


'माझ्या आयुष्यात असला हिटलर केला नाही'


हिटलरच्या भूमिकेबद्दल बोलतांना प्रशांत दामले यांनी म्हटलं की, “मुळात हिटलर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक आकृती येते, प्रकृती येते. मी माझ्या आयुष्यात असला हिटलर केला नाही आणि करणारही नाही. हे जे पात्र आहे त्याला हिटलर का म्हणावे हा प्रश्न पडावा असे हे पात्र आहे. ते करायला मिळावे आणि परेश व मधुगंधाबरोबर करायला मिळावे हे महत्वाचे. परेशबरोबर मी पहिल्यांदाच काम करत आहे. दिग्दर्शक कसा असावा तर तो असा असावा. तो एक अप्रतिम दिग्दर्शक आहे.”


हिटलरच्या निवडीबाबत बोलताना लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशीने म्हटलं की, “आमचा हिटलर कसा असावा याबाबत चर्चा सुरु होती. हिटलर म्हणजे क्रूर, जगज्जेता, कठोर अशी त्याची प्रतिमा आहे. पण नाटकाचा फार्सिकल बाज पाहता, आमचा हिटलर ‘क्युट’ असावा अशी एक टूम निघाली. आता क्युट हिटलर कोण, असा प्रश्न आल्यावर महाराष्ट्रात क्युट म्हणून ज्याची ओळख आहे, असे एकाच नाव पुढे आले आणि ते म्हणजे प्रशांत दामले. नाटकामधून या कथेचे चित्रपटात रुपांतर होताना जे बदल झाले, मग त्यात वयोगट आला, आज त्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे, याबद्दल चर्चा झाली. त्यातून मग कलाकारांची निवड झाली आणि ती चपखल आहे. त्यातून ही कलाकर मंडळी त्या त्या पात्रांमध्ये अगदी फिट्ट बसली आहेत, आणि ते तुम्ही पहालच.”


ही बातमी वाचा : 


Gunaratna Sadavarte : इसका बाप बोलता था, जयश्री शादी की जरुरत नही है, गुणरत्न सदावर्तेंनी लव्ह मॅरेजबद्दल सविस्तर सांगितलं!