Ashok Saraf : काही दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेते आणि सर्वांचे लाडके मामा म्हणजेच अशोक सराफ (Ashok Saraf) यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' (Maharashtra Bhushan Award) जाहीर करण्यात आला. तसेच आज म्हणजेच गुरुवार 22 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे. यंदा हा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता होणाऱ्या 57 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात करण्यात येतील. या समारंभास केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. पीयूष गोयल, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अशोक मामांनी प्रेक्षकांची मनं जिंकली
आपल्या बहारदार अभिनयाने चित्रपटांचा पडदा, नाटकांचं व्यासपीठ, टीव्हीची स्क्रीन आणि बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेला सुवर्णझळाळी बहाल करणाऱ्या अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कधी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर खुदकन् हसू, कधी आशयघन अभिनयाने डोळ्यांत टचकन् पाणी आणणारे,तर कधी कसदार अभिनयाने प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे अशी अशोक सराफ यांचं वर्णन केलं जातं. अशोक सराफ यांनी माध्यमांचे जवळपास सर्वच प्लॅटफॉर्म भारावून टाकले.
मराठी म्हणू नका, हिंदी म्हणून नका. अगदी भोजपुरी सिनेमांनाही अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने अक्षरश: सजवलं. कधी नायक, कधी सहनायक तर कधी खलनायक अशा भूमिकांची तोरणं त्यांनी मनोरंजन विश्वावर बांधली. महत्त्वाचं म्हणजे, फक्त अभिनयच नाही तर, त्यांनी अनेक सिनेमांमध्ये गाणीही गाऊन, प्रेक्षकांना सूरमयी अनुभव दिला. अशा या चौफेर मुशाफिरी करणाऱ्या, महान अभिनेत्याचा महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आलाय.
कलासृष्टीची सेवा करणाऱ्या जेष्ठ कलावंतांचा गौरव
त्याचप्रमाणे मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार आहे.