Ashok Saraf : आपल्या बहारदार अभिनयाने चित्रपटांचा पडदा, नाटकांचं व्यासपीठ, टीव्हीची स्क्रीन आणि बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेला सुवर्णझळाळी बहाल करणाऱ्या अशोक सराफ (Ashok Saraf) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर झालाय. कधी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर खुदकन् हसू, कधी आशयघन अभिनयाने डोळ्यांत टचकन् पाणी आणणारे,तर कधी कसदार अभिनयाने प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे अशी अशोक सराफ यांचं वर्णन केलं जातं.


180 मराठी सिनेमे, 52 हिंदी सिनेमे, 12 नाटकं आणि त्याचे हजारो प्रयोग, 10 टिव्ही मालिका आणि कमावलेले अगणित चाहते. अशोक सराफ यांचा प्रवास अकड्यांमध्ये कोंडणं अशक्य आहे. पण याच प्रवासाचा यथोचित सन्मान करण्यासाठी राज्य सरकारनं अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केलाय.भन्नाट टायमिंग, भूमिकेतलं वैविध्य आणि सहजता या जोरावर अशोक सराफ यांनी रंगमंच, चित्रपट आणि मालिका या तिन्हींमध्ये आपला ठसा उमटवला.अशा या दिग्गज अभिनेत्या कारकिर्दीचा प्रवास जाणून घेऊयात. 


असा सुरु झाला अशोक सराफांच्या अभिनयाचा प्रवास


अशोक सराफ हे मूळचे बेळगावचे असले तरीही त्यांचा जन्म मुंबईतच झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. सुरुवातीपासूनच मामांना अभिनयाची आवड होती. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी मामांनी अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरु केला जो आजही अविरत सुरु आहे.  त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंभूमीवर पाऊल ठेवलं. गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या.


सुरुवातीला अशोक मामांच्या वडिलांचा त्यांच्या अभिनयाला विरोध नसला तरीही त्यांनी बँकेत नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांच्या इच्छा करावी. त्यानुसार अशोकमामांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केलीही. त्याचसोबत ते थिएटर देखील करत होते. पण त्यांच्या अभिनयाच्या ओढीने त्यांनी सगळं बाजूला सारत त्यांच्या अभिनयाचा प्रवास अखंड सुरु ठेवला. वयाची पंचाहात्तरी पार केल्यावरही रंगमंचावर व्हॅक्यूम क्लीनरसारख्या नाटकातून अशोक सराफ यांच्या अभिनयाची मोहिनी कायम राहिलीय.


मामांच्या अभिनयाचे विविध पैलू


दादा कोंडकेंसोबत पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे अभिनयाचे विविध पैलू त्यांनी उलगडले. 'वजीर'सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा त्यांनी निभावली. ऐंशीच्या दशकात लक्ष्यामामा आणि अशोकमामा या जोडीने महाराष्ट्राला खळखळून हसवलं आणि कलेच्या माध्यमातून त्यांच्या मनोजरंजनाची सेवा देखील केली. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, एक गाडी बाकी अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन नाही केलं तर मराठी चित्रपटाचा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.


अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा यांसारख्या कलाकृती साकार झाल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'दामाद' या चित्रपटापासून त्यांच्या दमदार अभिनयाची एन्ट्री केली. 'करण अर्जुन', 'कोयला', 'येस बॉस', 'जोडी नं.१' हे अशोक सराफ यांचे हिंदीतील काही उल्लेखनीय चित्रपट. अमेरिकेतील सिएटल येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शनमध्ये त्यांनी विजय केंकरे दिग्दर्शित 'हे राम कार्डिओग्राम' या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही पाऊल ठेवले आहे.


कोट्यवधी रडवेल्या भाच्यांना आपल्या विनोदानं खळखळून हसवणारे मामा 


अशोकमामांनी मराठी रसिकांना आनंद तर दिलाच पण नवोदित कलाकारांना भक्कम पाठबळही दिलं. अशोक सराफ यांना इंडस्ट्रीमध्ये अशोक मामा म्हंटलं जातं पण अशोक मामा हे फक्त इंडस्ट्रीचे मामा नाहीत,  ते आपल्या प्रत्येकाचे मामा आहेत. हा मामा... नेहमी आपल्याला आनंदाच्या गावी घेऊन गेलाय. कधी त्याने आपल्या दुःखांवर हळूवार फुंकर घातली, तर कोट्यवधी रडवेल्या भाच्यांना आपल्या विनोदानं खळखळून हसवलं तर कधी या मामानं आपले लाडके हट्ट पुरवले. मामांचे सिनेमे कितीही वेळा, कितीही काळ आणि कुठूनही पाहिले तरी एन्टरटेन्मेन्टची हमखास गॅरंटीच मिळते. ना कधी कोणत्या वादात, ना कधी कोणत्या चर्चेत आपण भलं,आपलं काम भलं असं म्हणत मामा आपल्या सर्वांचे मामा बनले. 


ही बातमी वाचा : 


Ashok Saraf : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकाराचा सन्मान, अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आज होणार गौरव