Asha Bhosale : प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये आशा यांनी त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. तसेच 'पिझ्झा खाणं सोडा आणि भाकरी खा', असंही आशा भोसले यांनी सांगितलं.
प्रोफेसर संजय बोराडे यांच्या जनरेशन XL या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल (23 मे) पार पडला. जनरेशन XL या लहानमुलांमधील स्थुलता या विषयावरील पुस्तक आहे. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे उपस्थितीत होते. लोअर परळच्या कोरम क्लबमध्ये हा सोहळा पार पडला असून या कार्यक्रमामध्ये बोलताना आशा भोसले यांनी काही फिटनेस टिप्स दिल्या आहेत.
बालपणीच्या आठवणींना उजाळा
कार्यक्रमामध्ये आशा भोसले म्हणाल्या,'बालपणी जास्त जाड नव्हते. पण गोड बेबी होते. दीदी मला कडेवर घेऊन जायची तिला मी खूप आवडत होते सगळ्यांनाच जाड मुलं आवडतात. तो जाडपणा बरेच वर्ष राहिला. त्यानंतर उंचीच्या मानानं वजन जास्त झालं होतं. ते वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले.चार- पाच गाणी दिवसातून गायचे. काही खाल्ल नाही तर गाता येत नव्हतं. पण 60 वर्षाची असताना माझं वजन 65 किलो होतं. ते मी आत्तापर्यंत तेवढंच ठेवलं आहे.'
सांगितला अमेरिकेतील किस्सा
' मी जेव्हा अमेरिकेत होते तेव्हा मी एकदा काही बायकांना रडताना पाहिलं. त्यांनी जेव्हा त्यांची मुलं दाखवली तेव्हा मला काळालं की ती मुलं खूप जाड होती. त्या मुलाला चालता देखील येत नव्हतं. ते पाहून मी थक्क झाले. मी त्यानंतर माझ्या सूनेला फोन केला आणि तिला सांगितलं की, माझ्या नातवाला पाकिटामधलं काही खायला देऊ नको फक्त वरण भात, पोळी दे. लहान मुलांचे सोडा आपण सर्वच जाड आहोत. सर्वांनी चालायला हवं तसेच स्वत:साठी वेळ काढायला हवा. असं तुम्ही का करत नाही?' असंही आशा भोसले म्हणाल्या.
दिल्या फिटनेस टिप्स
आशा भोसले यांनी काही फिटनेस टिप्स देखील दिल्या आहेत. त्या म्हणाल्या, लहान मुलं तुमचं पाहून खातात. तुम्ही जर पिझ्झा खाल्ला तर लहान मुलं पण खाणार. तुम्ही भाकरी का खात नाही? लग्न झाल्यानंतर मुलींचे वजन वाढते. मी मुलींना म्हणलं मी तुम्हाला लग्नामध्ये पाहिलं पण मी तुम्हाला ओळखलं नाही. लग्ननंतर बायकांचे वजन वाढते. माझी आई म्हणायची पाच इंद्रियांना सांभाळायची गरज नाही. एकच इंद्रिय सांभाळा ते म्हणजे जीभ. खाणं चांगलं असेल तर तुम्ही सुंदर दिसाल. मी सगळी काम केली आहे. मी विहीरीमधील पाणी देखील काढलं आहे.'
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या