Arundhathi Nair Accident : प्रसिद्ध तमिळ आणि मल्याळम (South Actress) अभिनेत्री अरुंधती नायर (Arundhathi Nair) हिचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. अरुंधतीचा 14 मार्च रोजी अपघात झाला असून ती या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती तिच्या बहिणीने पोस्ट शेअर करत दिलीये. सध्या अरुंधतीवर उपचार सुरु असून ती त्रिवेंद्रममधील अनंतपुरी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती देण्यात आलीये.
माहितीनुसार, या अपघातामध्ये अरुंधतीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तिच्या बहिण आरती हिने 18 मार्च रोजी सोशल मीडिया अकाऊंवर पोस्ट शेअर केली. त्यामध्ये तिच्या बहिणीने अरुंधतीच्या अपघाताची माहिती दिली. जेव्हा अरुंधती प्रवास करत होती त्यावेळी तिचा भाऊ तिच्यासोबत होता. दरम्यान तिच्या अपघाताची माहिती मिळताच तिच्या चाहत्यांमध्येही चिंतेंच वातावरण पाहायला मिळत आहे.
अरुंधतीच्या बहिणीने पोस्टमध्ये काय म्हटलं?
अरुंधतीची बहिण आरती हीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत अरुंधतीच्या अपघाताविषयी माहिती दिली. यामध्ये आरतीनं म्हटलं की, 'हे खरं आहे की माझी बहीण अरुंधती नायर हिचा तीन दिवसांपूर्वी अपघात झाला. तिला गंभीर दुखापत झाली आहे आणि तिला त्रिवेंद्रममधील अनंतपुरी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. ती मृत्यूशी झुंज देत आहे.' अरुंधती आणि तिचा भाऊ एका युट्युब चॅनलला मुलाखत देऊन परत येत होते. तेव्हा दुचाकीवरुन येताना त्यांचा अपघात झाला.
कोण आहे अरुंधती नायर?
अरुंधती नायर हीने 2014 मध्ये पोंगी एझू मनोहरा या चित्रपटातून सिने विश्वात पदार्पण केलं. विजय अँटोनीच्या सैथान या चित्रपटामधून ती प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. त्याचप्रमाणे 2018 मध्ये तिने ‘ओट्टाकोरू कामुकन’ या मल्याळम चित्रपटातून मल्याळम सिनेविश्वात पदार्पण केलं. अरुंधती ही 2023मध्ये आलेल्या ‘आईराम पोरकासुकल’ या तमिळ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.