मुंबई :  कोरोना व्हायरसच्या महामारीमुळं देशव्यापी लॉकडाऊन असल्यानं बॉलिवूडमधले सगळे स्टार मंडळी घरातच आहेत. मात्र कोरोनापासून बॉलिवूड वाचू शकलेलं नाही. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्याचं समोर आल्यानंतर आता अभिनेते अनुपम खेर यांच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या आई दुलारी (Dulari) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, त्यांच्या आईला मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखलं केलं आहे. भाऊ, वहिनींनी काळजी घेऊन देखील त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मी माझी टेस्ट केली आहे, ती निगेटिव्ह आली आहे, असं अनुपम खेर यांनी सांगितलं.

अनुपम खेर यांनी म्हटलं आहे की, मागील काही दिवसांपासून माझी आई जिला आपण  दुलारी म्हणून ओळखता. त्यांना भूक लागत नव्हती. त्या काही खात नव्हत्या आणि नुसतं झोपून राहत होत्या. आम्ही डॉक्टरांकडून त्यांची ब्लड टेस्ट केली. त्यात सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचं सिटी स्कॅन करायला सांगितलं. यावेळी त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली. जी पॉझिटिव्ह आली आहे.

काल रात्री अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. अमिताभ यांना सुरुवातीला सौम्य लक्षणं दिसताच त्यांनी कोरोना टेस्ट करुन घेतली. त्यांच्या आणखी चाचण्या करण्यात येत असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे. अमिताभ आणि अभिषेक दोन्ही बापलेकांना मुंबईतील प्रसिद्ध नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

कोरोनाचा फटका याआधीही बॉलिवूडला बसलाय. गेल्या महिन्यातच आमिर खानच्या घरातील सात कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले होते. यात आमिरचे दोन अंगरक्षक आणि एक स्वयंपाक करणारा कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर आमिरच्या संपूर्ण कुटुंबाची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात त्याच्या घरातील सदस्य निगेटिव्ह आले होते. त्याआधी जान्हवी कपूर आणि करण जोहरच्या स्टाफलाही कोरोनाची लागण झाली होती.


संबंधित बातम्या
लॉकडाऊन काळात बिग बी अमिताभ यांचं घरुन शूट, KBC सह काही जाहिरातींचं चित्रिकरण

Bachchan family | अमिताभ, अभिषेक यांच्या व्यतिरिक्त बच्चन कुटुंबातील सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

Abhishek Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यानंतर मुलगा अभिषेक बच्चन याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह