Ambani-Radhika Merchant wedding : मुंबईत येत्या 13 जुलै रोजी अंबानी कुटुंबातला लग्नसोहळा पार पडणार आहे. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नसोहळ्यासाठी मुंबईती वाहतूक मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. वांद्रे येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्येच हा लग्नसोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्ताने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच यावेळी कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार याविषयी देखील मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
मुंबई पोलिसांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. यावेळी बीकेसीमधील कोणते मार्ग बंद असणार आणि कोणत्या मार्गाने मुंबईकरांना प्रवास करावा लागणार, याविषयी देखील सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे कोणत्या तारखांसाठी हे बदल करण्यात आले आहे, ही देखील माहिती पोलिसांनी दिली आहे.
'या' दिवशी वाहतूक मार्गात होणार बदल
मुंबई पोलिसांकडून वाहतूक मार्गांविषयीचे माहितीपत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये म्हटल्यानुसार, 12 जुलै दुपारी 1 वाजल्यापासून ते 15 जुलै दुपारी 12 वाजेपर्यंत हे नियम लागू राहतील. त्यामुळे या वेळेत मुंबईकरांना मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
असा असणार वाहतूक मार्गातला बदल
लक्ष्मी टॉवर जंक्शनपासून कुर्ला एमटीएनएलमध्ये प्रवेश नाही
लक्ष्मी टॉवर जंक्शन-धीरूभाई अंबानी स्क्वाअर एव्हेन्यू लेन 3-इंडियन ऑइल पेट्रोल पंप-डायमंड जंक्शन-हॉटेल ट्रायडंट येथून कुर्ला एमटीएनएलच्या मार्गावरुन प्रवास करता येणार नाही. पण लग्नसोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना या मार्गावरुन प्रवास करता येणार आहे.
धीरुबाई अंबानी स्क्वेअर अव्हेन्यूच्या येथील वाहतूक मार्ग
कुर्ल्याहून येणाऱ्या वाहनांना धीरुबाई अंबानी स्क्वेअर अव्हेन्यू/इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर प्रवेश दिला जाणार नाही. कुर्ला व्यतिरिक्त, MTNL जंक्शन, प्लॅटिना जंक्शन, डायमंड जंक्शन, BKC ते BKC कनेक्टर ब्रिजकडे जाणाऱ्या मार्गावरूनही वाहतूक करता येणार नाही.
जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरजवळ वाहतूक मार्गात बदल
भारत नगर, वन बीकेसी, वी वर्क, गोदरेज, बीकेसी येथून जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर गेट क्रमांक 23 कडे जाणारी वाहने अमेरिकन कॉन्सुलेट, एमटीएनएल जंक्शनकडे जाण्यासाठी वाहतूक रोखण्यात आली आहे.
एमटीएनएल जंक्शनजवळ वाहतूकीत बदल
MTNL जंक्शनकडून येणारी वाहने सिग्नेचर/सन टेक बिल्डिंग येथे अमेरिकन कॉन्सुलेट, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि BKC कनेक्टरकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग
दरम्यान या मार्गवरुन बीकेसीकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली आहे. पण यासाठी पर्यायी मार्ग देखील देण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरुन वाहतूक करणाऱ्यांना आता बीकेसकडे जाण्यासाठी लक्ष्मी टॉवर जंक्शन-डायमंड गेट 8 वरुन डावीकडे आणि नाबार्ड जंक्शन येथून उजवीकडे वळून धीरुबाई अंबानी स्क्वेअर/इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या मार्गावरुन बीकेसीसाठी जावे लागणार आहे.