Nana Patekar :  आजवर अभिनेता-दिग्दर्शक आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नानांची (Nana Patekar) सुरेल बाजू संगीत प्रेमींसमोर येणार आहे. कारण संगीत क्षेत्रात 25 वर्षे पूर्ण केल्याचं औचित्य साधत सागरिका म्युझिकडून नानाछंद या अल्बमचे अनावरण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या अल्बममधील गाणी नाना पाटेकर यांनी शब्दबद्ध केली आहेत. तसेच  वर्षानुवर्षे स्मरणात राहणारं ठरेल वैशाली सामंत, राहुल देशपांडे आणि स्वप्नील बांदोडकर या तीन सर्वोत्कृष्ट गायकांच्या आवाजात ही गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. 


'नानाछंद' या अल्बममधील गाणी नाना पाटेकर यांनी लिहिली असून, संगीतकार नीलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केली आहेत.या अल्बमची मांडणी-निर्मिती विक्रम बाम यांनी केली आहे. वरद कठापूरकर, सचिन भांगरे, विनायक नेटके आणि इतर प्रतिभावान संगीतकारांनी वादन केलं आहे. अवधूत वाडकर, तुषार पंडित आणि अजिंक्य धापरे रेकॉर्डिंग आणि मिक्स इंजिनिअर आहेत.


अन् शब्द आपसूकच ओठांवर येतात - नाना पाटेकर


नाना पाटेकरांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, ‘मी निसर्गात जास्त रमतो. त्यामुळे त्या  सगळ्याशी  माझी  खूप  जवळीक आहे. अनेकदा  ते शब्द आपसूक ओठावर येतात. त्या शब्दांना  निलेशने अतिशय  मेहनतीने सुरांमध्ये  गुंफलंय त्यातूनच ही गीत निर्मिती झाली.  सागरिका म्युझिक आणि सागरिका बाम यांनी  या  गीतांना  सुंदरतेने  एका अल्बमच्या  माध्यमातून  प्रकाशित  केलं आहे.  याचा अतिशय आनंद मला आहे.'


या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर,  ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर गायक सुदेश भोसले  यांनीही हजेरी लावली होती. तसेच त्यांनी सागरिका म्युझिकला पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा देखील दिल्या. भारतातील विविध भाषांमध्ये संगीत तयार करण्यासाठी समर्पित संगीत लेबल तयार करून तरुण आणि प्रतिभावान गायक-संगीतकारांसाठी हक्काचं व्यासपीठ तयार करणं ही सागरिका म्युझिकच्या प्रवासातील पुढली महत्त्वाची पायरी ठरली.


सागरिका म्युझिकविषयी...


मागील काही वर्षांमध्ये सागरिकाने हिंदी, मराठी, बंगाली आणि इंग्रजीमध्ये 11,000 हून अधिक ट्रॅक्सची निर्मिती आणि विपणन केलं आहे. 300 हून अधिक संगीत व्हिडिओ आणि डिजिटल कलाकृती, मुलांसाठी 100 अॅनिमेटेड चित्रपट आणि यशस्वी संगीतावर आधारित लाईव्ह टेलिव्हिजन कलाकृती तयार केल्या आहेत. आजवर सागरिका म्युझिकच्या माध्यमातून उस्ताद रशीद खान, पं. अजय चक्रवर्ती, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा,  जसराज, सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, अजय-अतुल, शंकर महादेवन, श्रेया घोषाल, महालक्ष्मी अय्यर, विजयप्रकाश, सचिन पिळगावकर, आदर्श शिंदे, अनुप जलोटा, शान, कुमार सानू, बिक्रम घोष अशा बऱ्याच दिग्गजांनी आपली कला संगीत प्रेमींपर्यंत पोहोचवली आहे.


ही बातमी वाचा : 


Nivedita Saraf : 'आज लक्ष्याची खूप आठवण आली', मित्राच्या लेकाचं कौतुक; निवेदिता सराफांनी अभिनय बेर्डेसाठी लिहिली खास पोस्ट