नागपूर : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या आगामी सिनेमाच्या शूटिंगला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन तब्बल दीड महिना विदर्भात तळ ठोकणार आहेत.

या सिनेमाचं 40 ते 45 दिवसांचं शूटिंग नागपुरात होणार आहे. नागपूरच्या सेंट जॉन शाळेच्या आवारात ह्या सिनेमाचा सेट उभारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन तब्बल दीड महिना नागपुरात राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

नागराजच्या बॉलिवूडमधील पदार्पणाच्या सिनेमात अमिताभ बच्चन काम करत आहेत. अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर अखेर नागराज मंजुळेंच्या 'झुंड' या चित्रपटाच्या शूटिंगला मुहूर्त मिळाला आहे. बिग बी आणि नागराज हे अनोखं कॉम्बिनेशन पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

'ठग्ज ऑफ हिंदुस्थान', कौन बनेगा करोडपती यासारखे प्रोजेक्ट संपल्यानंतर बिग बीनं आपल्या तारखा 'झुंड' सिनेमासाठी दिल्या आहेत.

चित्रपटाचा सेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून हटवल्यानंतर चित्रीकरण लांबणीवर पडलं होतं. त्यानंतर तारखांचा घोळ झाल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी सिनेमा सोडलाही होता. मात्र अखेर बिग बी पुन्हा सिनेमात काम करण्यास राजी झाले.