मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिच्या वादग्रस्त ट्विटमुळं आणि वक्तव्यांमुळं ती कायमच चर्चेत असते. कंगनाच्या अशाच वर्तणुकीमुळे आणि तिच्याकडून वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त ट्विटमुळे बी- टाऊनची क्वीन म्हणवल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं. तिच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी बंदी आणण्यात आली. पश्चिम बंगाल निवडणूक निकाल आणि त्यानंतर तिथं झालेला हिंसाचार यांच्या पार्श्वभूमीवर मांडलेली वादग्रस्त भूमिका कंगनाला चांगलीच भोवली. ज्यानंतर आता कलाविश्वातूनही काही मंडळी तिच्या विरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे.
सेलिब्रिटी फॅशन आणि टेक्सटाईल डिझायनर आनंद भूषण यांनी यासंबंधीचं अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं. या पत्रकात कंगनाशी झालेले करार, त्यांच्या सोशल मीडियावर डिझाईन्स प्रमोट करण्याच्या निमित्तानं पोस्ट करण्यात आलेली कंगनाची छायाचित्र आता मागे घेण्याचा मोठा निर्णय़ त्यांनी घेतला आहे. भविष्यातही कंगनासोबत काम न करण्याची प्रतिज्ञा या सेलिब्रिटी फॅशन डिझायनरने घेतली असून, द्वेषभावना बळावणाऱ्या वक्तव्यांना आपण आणि आपला ब्रँड समर्थन देत नसल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी स्पष्ट केला.
'आज घडलेल्या सर्व घटना पाहता, कंगनाचा सहभाग असणाऱ्या कँपेनमधील सर्व छायाचित्र मागे घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कोणत्याही स्तरावर तिच्यासोबत भविष्यातही काम न करण्याची प्रतिज्ञा आम्ही घेत आहोत. एक ब्रँड म्हणून आम्ही द्वेषभावनेला दुजोरा देणाऱ्या वक्तव्याचं समर्थन करत नाही', असं भूषण यांनी प्रसिद्ध केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं. ज्यानंतर लगेचच अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं भूषण यांच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली.
ट्विटरवरून निलंबित झाल्यानंतर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया
ट्विटर अकाऊंट निलंबित होताच कंगनाची पहिली प्रतिक्रिया
"ट्विटरने हे पुन्हा सिद्ध केलं की ते अमेरिकन आहेत आणि अमेरिकन लोक काळ्या (ब्राउन) लोकांना गुलाम बनवण्याच्या मानसिकतेने जन्माला आले आहेत. ते ठरवतात की आपण काय विचार करावा, काय बोलावे किंवा काय करावे. सुदैवाने माझ्याकडे आणखी काही प्लॅटफॉर्म आहेत, ज्याद्वारे मी आवाज उठवू शकते आणि माझ्या सिनेमाबद्दल बोलू शकते", अशी प्रतिक्रिया तिने लेखी निवेदनाद्वारे दिली होती.