नागपूर : नागपूर आणि जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे. ओदिशा राज्यातील अंगुल येथून 60 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार असून नागपूर विमानतळावरुन चार टॅंकर मंगळवारी विमानाने भुवनेश्वरला रवाना करण्यात आले. मेडिकल ऑक्सिजन भरलेले हे टँकर येत्या तीन दिवसात नागपूरला परत पोहोचतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ओदिशाला टँकर्स घेऊन रवाना झालेल्या विमानाचा फोटो ट्विटरवर शेअर करत ही माहिती दिली.
नागपूर जिल्ह्यासाठी 140 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे तर विभागासाठी एकूण 240 मेट्रिक टन आवश्यक आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची ऑक्सिजनची गरज वाढल्यामुळे नागपूर जिल्ह्यासाठी भिलाई इथून मिळणारा 110 मेट्रिक टन ऑक्सिजनचा कोटा काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने ओदिशामधून ऑक्सिजन आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अंतर जास्त असल्याने टँकर विमानाने पाठवण्यात आले आहेत.
हवाई दलाचे विमान रात्री 9 वाजता ओदिशासाठी रवाना झाले. भुवनेश्वरपासून 130 किमी दूर असलेल्या अंगुलवरुन दररोज 60 मॅट्रिक टन ऑक्सिजन भरुन हे टॅंकर नागपूरला पोहोचतील.