Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाने (Maratha Reservation) व्यापक रुप घेतल्यानंतर मनोज जरांगेंचा (Manoj Jarange) हा लढा रुपेरी पडद्यावरच साकारला जाणार आहे. यामध्ये 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' आणि 'आम्ही जरांगे' असे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दरम्यान मागील काही दिवसांमध्ये हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा आम्ही जरांगे या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.
आम्ही जरांगे आणि संघर्षयोद्धा हे सिनेमे 14 जून रोजीच प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता आम्ही जरांगे या सिनेमाच्या टीमने एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, हा सिनेमा 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हे सिनेमे एकाच दिवशी रिलीज करण्याची बातमी समोर आल्याने प्रेक्षकांमध्येही थोड्या प्रमाणात संभ्रमाचं वातावरण होतं. पण आता हे दोन्ही सिनेमे वेगवेगळ्या दिवशी रिलीज होणार आहे.
दिग्दर्शकांनी काय म्हटलं?
एबीपी माझाला आम्ही जरांगे या सिनेमाच्या टीमने दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे. त्यामध्ये सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांनी केलं आहे. त्यांनी एबीपी माझाला सांगितलं की, 'एका विषयावर हे दोन्ही सिनेमे नाहीत. दोन्ही सिनेमे वेगळे आहेत. तसेच माझा हा सिनेमा प्रत्येकाला आपलंस करुन जाईल असा मला एक दिग्दर्शक म्हणून विश्वास आहे.हा चित्रपट बनवताना आमचा एक हेतू होता की, आरक्षणाची व्याख्या ही लोकांपर्यंत पोहचली पाहिजे, तर ते दाखवत असताना कदाचित संभ्रम होऊ शकतो. त्यानंतर मी आमच्या निर्मत्यांशी वैगरे चर्चा केली, ते देखील म्हणाले की, आपला हेतू यामध्ये कुठेही थांबून राहता कामा नये. म्हणून मग आम्ही ठरवलं की, हा सिनेमा सात दिवस पुढे ढकलूया. हा सिनेमा आम्ही पैसे कमवण्यासाठी केलेला नाहीये. त्यांचाही सिनेमा त्याच दिवशी येत आहे, त्यामध्ये संभ्रम होऊ नये, त्यांच्या सिनेमालाही शुभेच्छा. पण आम्ही आमचा हा सिनेमा येत्या 21 जून रोजी प्रदर्शित करणार आहोत.'
'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. नारायण प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे, सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरकर, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे आदी कलाकारांची मांदियाळी दिसणार आहे.