मुंबई : अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर नुकतीच रिलीज झालेली वेबमालिका 'तांडव' वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान 'तांडव'शी संबंधित कोणत्याही कलाकार किंवा अन्य व्यक्तीने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. वाढत्या राजकीय वादावादी आणि पोलिसांच्या तक्रारीत अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने देखील या प्रकरणावर मौन बाळगले होते. मात्र आता या वेबसिरीजमुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्याबद्दल अॅमेझॉन प्राईमने माफी मागितली आहे. अॅमेझॉनने या बाबतचे अधिकृत निवेदन जारी केले आहे.
अॅमेझॉनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही प्रदर्शित केलेल्या तांडव या वेबसिरीजमध्ये काही दृश्य प्रेक्षकांना आक्षेपार्ह वाटली. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता. आम्ही प्रेक्षकांच्या भावनांचा सन्मान करतो. आता ती आक्षेपार्ह दृश्य वगळण्यात आली आहे.
दिग्दर्शक अली अब्बास झफरला हायकोर्टाचा अंतरिम दिलासा
मुंबईसह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशमधील हजारातगंज पोलीस ठाण्यात तांडव वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्राबाहेरील प्रकरणांत अटक होऊ नये त्यासाठी दिग्दर्शक अली अब्बास झफर, निर्माते हिमांशू मेहरा आणि लेखक गौरव सोलंकी यांनी ट्रान्झिट अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायलयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर बुधवारी तातडीने न्यायमूर्ती पी. डी नाईक यांच्या समोर सुनावणी पार पडली. तेव्हा, कोरोनाच्या पाश्रवभूमीवर उत्तर प्रदेशातील न्यायालयात नियमित अटकपूर्व जामीन अर्ज करता यावा म्हणून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्यावतीनं करण्यात आली. तर हिंदू देवतांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखविण्यात आलेला भाग वेबसीरिजमधून काढण्याच्या तयारीत असल्याचंही निर्मात्यांकडून सांगण्यात आलं. तसेच उत्तर प्रदेशातील कोर्टात नियमित अटकपूर्व जामीन अर्ज करता यावा म्हणून चार आठवड्याचा अवधी न्यायालयाकडे मागण्यात आला होता. या संबधित गुन्हाची नोंद लखनऊच्या हजारातगंज पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. त्या एफआयआरची प्रत वगळता न्यायालयात कोणतेही कागद पत्र सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे इथं अटकेची कोणतीही भीती नसल्याचा दावा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आला. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशातील कोर्टात नियमित अटकपूर्व जामीन अर्ज करता यावा म्हणून तिघांनाही 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तीन आठवड्यांसाठी ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर करत त्यांना दिलासा दिला आहे.
अली अब्बास जफर हा तांडवचा दिग्दर्शक आहे. सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर यांच्या या सीरीजमध्ये प्रमुख भूमिका आहेत. राजकारणावर आधारित या सीरीजमध्ये एका कॉलेजच्या गँदरिंगमध्ये नाटकात देवदेवतांच्या संवादाचं दृश्य आहे. सध्याचा वाद त्यावरुनच सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- In Pics | सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसमध्ये 'तांडव'
- Tandav Row: वादानंतर 'तांडव' वेबमालिकेच्या दिग्दर्शकाने मागितली माफी
- 'तांडव' वादावर विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया, म्हणाले, हिंदूंच्या भावना दुखावण्याचा विदेशी कट
- Tandav | 'तांडव' वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात, हिंदू विरोधी असल्याचा भाजप नेत्यांचा आरोप
- 'तांडव' वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सैफ अली खान-करीना कपूर यांच्या घरांची सुरक्षा वाढवली