पुणे : 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' यांसारखे चित्रपट देणारा तरुण दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकरची एक वेगळी ओळख. सध्या त्याच्या आगामी 'पावनखिंड' या चित्रपटाच्या प्रदर्शनात तो व्यग्र आहे. अशातच पुण्याहून मुंबईला जाताना दिग्पालच्या अचानक छातीत दुखू लागलं. त्याला तातडीने पुण्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.


रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्या प्रकृतीच्या उलट-सुलट चर्चांना उधाण आलं. पण आता मात्र त्याची प्रकृती स्थिर असून आरामाची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.


मंगळवारी दिग्पाल आणि सहकारी सुश्रुत मंकणी पुण्याहुन मुंबईला चालले होते. वाटेत अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं. याची माहिती देताना सुश्रुत म्हणाला, 'अस्वस्थ वाटू लागल्याने आम्ही पुण्यात परतायचा निर्णय घेतला. दरम्यान दिग्पाल काही वेळ बेशुद्धही झाले. आम्ही तात्काळ त्यांना पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटल मध्ये दाखल केलं आहे. डॉक्टरांनी लगेच आवश्यक चाचण्या केल्या आहेत. काळजीचं कारण नसून, अतिताण आल्याने त्याला हा त्रास झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. सध्या त्याला हृदय विकाराचा झटका आपयाच्या बातम्या येतायत त्या निखालस चुकीच्या आहेत. त्याला आता विश्रांतीचा सल्ला दिला आहे.'


'टेक्नीक ही गलत है', परिणीती चोप्राच्या 'सायना' चित्रपटाची नेटकऱ्यांकडून खिल्ली


गेल्या काही वर्षांपासून दिग्पाल शिवाजी महाराजांच्या काळाील चित्रपट साकारत शिवकालीन इतिहास प्रेक्षकांपुढे सादर करत आहे. त्याने साकारलेल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आदी चित्रपटांना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. अभिनयाच्या बाबतीतही तो आपली वेगळी छाप पाडतो. त्याच्या तब्येतीची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मग अफवांना उधाण आलं. त्याला हृदयविकाराचा झटका आला इथपासून कोरोना होण्यापर्यंत मजल गेली. या बातम्यांत तथ्य नसून केवळ अति ताण आल्यामुळे हा त्रास झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्याचा भाऊ आणि मित्र परिवार त्याच्यासोबत आहेत. शिवाय डॉक्टरही त्याच्या तब्येतीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. लोकांनी कोणत्याही माध्यमाद्वारे अफवा पसरवू नयेत असं आवाहन सुश्रुत यांनी केलं आहे.