Ajuni Marathi Movie : मराठी मनोरंजन विश्वातही सध्या सायफाय कथानक असलेल्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. प्रेक्षकांना देखील या कथा आवडत आहेत. प्रेक्षकांची हीच आवड लक्षात घेता आगामी सायफाय कथानक असलेला चित्रपट म्हणून साकार राऊत दिग्दर्शित ‘अजूनी’ (Ajuni) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अतिशय उत्कंठावर्धक अशा या चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं असून, हा चित्रपट 8 जुलैला प्रदर्शित केला जाणार आहे.


‘संघर्षयात्रा’, ‘शिव्या’ असे उत्तम चित्रपट केलेला दिग्दर्शक साकार राऊत एक अनोखी कथा ‘अजूनी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करत आहेत. अर्थ स्टुडिओज यांच्या संयोगाने सारा मोशन प्रा.लि. आणि गोल्डन पेटल्स फिल्म्स यांनी ‘अजूनी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला


अभिनेता पियुष रानडे, प्रणव रावराणे, प्रतीक देशमुख, अभिनेत्री श्वेता वेंगुर्लेकर यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. साकार राऊत यांच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा ‘अजूनी’ हा चित्रपट खूपच वेगळा ठरणार आहे. चित्रपटाचा विषय आणि कथानक अतिशय वेगळं असल्याचं, सायफाय कथानकाला प्रेमाचा पदर असल्याचं या टीझरमधून दिसून आलं आहे. आता या चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करतानाच टीझर पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.


‘अजूनी’ या चित्रपटात एलियनची अर्थात परग्रहवासीची गोष्ट मांडण्यात आली आहे. नदीच्या मधोमध होडीत बसून घाटाकडे पाहणारा तरूण टीजर पोस्टरमध्ये दिसत आहे. तसंच, चित्रपटाचा लूक आणि फील अतिशय इंटरेस्टिंग वाटतो आहे. त्यामुळे नावातलं आणि कथानकातलं वेगळेपण चित्रपटातही नक्कीच दिसेल यात शंका नाही.


प्रेक्षकांनाही सायफायची क्रेझ


मराठी मनोरंजन विश्वात याआधीही असे प्रयोग झाले आहेत. ‘फुंतरू’, ‘झोंबीवली’ या चित्रपटांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. हॉलिवूडप्रमाणेच आता मराठीतही सायफाय, थ्रिलरचा ट्रेंड पाहायला मिळतो आहे. त्यामुळेच लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘अजूनी’ला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेता पियुष रानडे मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.


हेही वाचा :


Panchayat Season 2 : प्रेक्षकांसाठी सरप्राईज! ठरलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच रिलीज झाली ‘पंचायत 2’


Cannes Film Festival 2022: लोकल ते ग्लोबल! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे पहिले लोककलाकार ठरले राजस्थानचे मामे खान


Happy Birthday Nawazuddin Siddiqui : कधीकाळी वॉचमनचे काम केले, दारोदारी मसाले विकले! आता बॉलिवूडवर राज्य करतोय नवाजुद्दीन सिद्दीकी!