न्यूयॉर्क : स्पेनमधील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो. पिकासो त्याच्या चित्रकलेतील शैलीसाठी जगभरात प्रसिद्ध होते. आजही त्यांची अनेक चित्रं चर्चेत असतात. असंच एक चित्र आता चर्चेत आलं आहे. कारण हे चित्र तब्बल 67.5 मिलियन डॉलर्समध्ये लिलावात विकलं गेलं आहे. मॉडर्निझम, सुररिअलीझम ह्यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मिलाफ पिकासोच्या चित्रांमधून दिसून येतो. क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पिकासोकडे जाते. या महान कलाकाराचं एक पेंटिंग मंगळवारी न्यूयॉर्कमधील लिलावात $67.5 दशलक्षमध्ये विकलं गेलं. ही विक्री ब्लू-चिप आर्टसाठी लिलावातील अलिकडची सर्वात मोठी विक्री आहे. 


1932 साली काढलेली पाब्लो पिकासोची पेंटिंग "Femme nue couchée" लिलावात ठेवली होती. जी $67.5 दशलक्षमध्ये विकली गेली. याच आठवड्यात अँडी वॉरहॉलच्या 1964 च्या मर्लिन मन्रोच्या सिल्क-स्क्रीन पोर्ट्रेटने क्रिस्टीज येथे लिलावात $195 दशलक्ष किंमत मिळवली होती. ही किंमत एका अमेरिकन कलाकाराच्या नावे नवा विक्रम मानली जात आहे.


लिलाव प्रक्रिया घेणाऱ्या हाऊस सोथेबीजने पिकासोची चित्रकला $60 दशलक्षांपेक्षा जास्त किमतीला विकली जाण्याची भविष्यवाणी केली होती. आणि घडलंही तसंच. 


या पेंटिंगमध्ये नेमकं आहे तरी काय


"Femme nue couchée," ज्याचे भाषांतर फ्रेंचमधून "Nude Reclining Woman" असे केले जाते. यात  Marie-Thérèseचे डोके मागे झुकवलेले दिसत आहे. समुद्री प्राणी असल्याचं प्रतीक म्हणून दाखवले आहे. तिचे पोहण्याचे प्रेम आणि पाण्यातील तिचा वावर जो समुद्राकडे जाण्याची प्रेरणा देत आहे, असं दाखवण्यात आलं आहे.  सोथेबीच्या म्हणण्यानुसार पिकासोला स्वत: पोहता येत नव्हते.
   
पिकासोचा जन्म स्पेनमधल्या आंदालुसिया प्रांतातील मालागा या शहरात झाला. कलेचा वारसा पिकासोला त्याच्या वडिलांकडूनच मिळाला. चित्रकलेत हुशार असणाऱ्या पिकासोने लहानपणी चित्रकलेत अनेक बक्षिसे मिळवली होती.
 
वयाच्या 19 व्या वर्षी पिकासो युरोपातील कलेचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पॅरिस शहरात येऊन दाखल झाला. नवीन देश, नविन लोक यामुळे आलेला उपरेपणा, बरोबर राहत असलेल्या जिवलग मित्राची आत्महत्या, त्याने तरुण मनावर झालेला खोल परिणाम आणि एकाकीपणा या सगळ्या भावना पिकासोच्या या काळातील चित्रांमध्ये दिसून येतात.