Munjya : आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित मुंज्या (Munjya) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियन सिनेमाला देखील या सिनेमाने मागे पाडलं आहे. अवघ्या दहा दिवसांतच या सिनेमाने 50 कोटींचा टप्पा पार केला असून आता हा सिनेमा 100 कोटींच्या घरात जाणार का याची उत्सुकता लागून राहिलीये. त्यामुळे मराठी दिग्दर्शकाचा सध्या बॉक्स ऑफिसवर दबदबा पाहायला मिळतोय. पण या सिनेमात बॉलीवूडचा एकही मोठा चेहरा का घेतला नाही? याविषयी स्वत: आदित्यने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 


मुंज्या हाच खरा माझ्या सिनेमाचा हिरो - आदित्य


बॉलीवूडच्या लोकप्रिय चेहऱ्यावर भाष्य करताना आदित्यने म्हटलं की, लोकप्रिय चेहऱ्यांमधून ते काहीतरी बॅगेज घेऊन येतात. हिंदीमध्ये तो लोकप्रिय कशावरुन होतात, की त्यांचं मागचं पात्र हे लोकांना आवडलेलं असतं. त्यामुळे लोकांना त्यांनी तशीच भूमिका करावी आणि आमच्या भेटीला यावं अशी अपेक्षा खूप असते. त्यामुळे नवीन कलाकार तुम्ही जेव्हा घेता हिंदीसाठी तेव्हा ते त्याच्या एक पात्र म्हणून पाहतात आणि मुंज्यामध्ये त्या पात्रांची गरज होती.


मुंज्याची कथा महाराष्ट्रातली, त्यामुळे कास्टिंगही मराठीच - आदित्य


सिनेमातील मराठी कलाकारांच्या कास्टिंगविषयी बोलताना आदित्यने म्हटलं की, मुंज्याची कथा ही महाराष्ट्रातली आहे, कोकणात आणि पुण्यात ती गोष्ट घडते. त्यामुळे माझं एक नेहमी असतं की जर कॅरेक्टर मराठी असेल तर कास्ट पण मराठीच हवी. म्हणजे दिल्लीतली कोणतीतरी आई किंवा आजी घेऊन त्यांना मराठी दाखवणार, मग तिची भाषा चुकणार, तिची संस्कृती वेगळी असणार. हे कळतं आपल्यला. त्यामुळे कथेतच मराठी पात्र होती, त्यामुळे मराठीतले चांगले कलाकार घ्यायचं ठरलं. म्हणजे सुहास जोशी जश्या आहेत, मला नेहमी त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा होती. म्हणून पारंपारिक कास्टिंग करुयात हा प्रयत्न करण्यात आला. भाग्यश्री लिमये, सुहास जोशी, अजय पुरकर, रसिका वेंगुर्लेकर अशी सगळी आपली मराठी मंडळी यामध्ये आहेतच . 


पुढे त्याने म्हटलं की, अभय वर्मा जो आहे, ज्याची आई पंजाबी आहे. त्यामुळे तो पंजाबी पण नाही आणि मराठी पण नाही. म्हणून मला तो असा चांगलं मिक्स कॉम्बिनेशन वाटलं. त्यातच ते पात्र एक वीस बावीस वर्षांचं होतं. त्यामुळे एखादा चाळीस वर्षांचा कलाकार घेऊन त्याला वीस बावीस वर्षांचा दाखवणं हे मला पटलं नाही. यामध्ये मला माझ्या निर्मात्यांनी देखील पाठिंबा दिला. त्यांनी मला सांगितलं की तुला जे योग्य वाटतं त्या लोकांना तू सिनेमासाठी कास्ट कर. 


ही बातमी वाचा : 


Munjya Movie : बॉक्स ऑफिसला झपाटून सोडणारा 'मुंज्या' मराठी का केला नाही? दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने सांगितलं कारण